आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थी याद्या प्रसिध्द न केल्यास धान्य बंद,जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींच्या याद्या प्रसिध्द न केल्यास संबंधित स्वस्त धान्य दुकानांचा धान्य पुरवठा बंद करून त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्‍हाधिकारी अनिल कवडे यांनी दिला.
जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेतील धान्य घोटाळयाचा पर्दाफाश ह्यदिव्य मराठीने केल्यानंतर जिल्हाधिका-यांनी 15 सप्टेंबरला सर्व गोदामे तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तथापि, संबंधित अधिका-यांनी थातूरमातूर कारवाई करत जिल्ह्यातील 18 पैकी अवघ्या दोन गोदामांची तपासणी करून जिल्हाधिका-याच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. याबाबत 4 ऑक्टोबरला "जिल्‍हाधिकारी आदेश धाब्यावर' असे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर याच दिवशी कवडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अन्न सुरक्षा योजनेतील केलेल्या लाभार्थ्यांना सुरळीत धान्य पुरवठा करण्यासाठी शासनाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व स्वस्त धान्य दुकानांपर्यंत धान्य पोहोचवण्याची ‌व्यवस्था करण्यात आली आहे. दुकानदारांनी शासनाकडे जितक्या ‍रकमेचा भरणा केला आहे, तितक्याच ‍रकमेचे धान्य वजन करून देण्याची व्यवस्था गोदामात केलेली आहे. वजनाबाबत दुकानदारास शंका असेल, तर त्यांनी स्वत: उपस्थित राहून धान्याचे वजन करून घ्यावे. ज्या दुकानदाराच्या गैरहजेरीत धान्य तसेच दुकानात पाठवले जाईल त्यांना धान्याच्या वजनाबाबत शंका आल्यास त्यांनी संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधावा. तालुक्याच्या शासकीय गोदामामध्ये भारतीय अन्न महामंडळाकडून प्राप्त होणाऱ्या संपूर्ण धान्याचे प्रामाणिकरण करून त्यांचे 50 किलोंच्या (बारदाना 50.65000) व प्लास्टिक गोणी (50.150) इतके वजन भरणे आवश्यक आहे. याबाबत सर्व तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असून, अचानक गोदामास भेट देऊन तपासणीत कमी वजन आढळून आल्यास संबंधित गोदामपाल व हमाल ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अन्न सुरक्षा योजनेत संपूर्ण धान्य लाभार्थ्यांना स्वस्त दरात मिळते किंवा नाही याची खात्री करण्यासाठी १ ऑक्टोबरपासून लाभार्थ्यांच्या याद्या स्वस्त धान्य दुकानदारांनी फलकावर लावाव्यात.
जिल्हास्तरावरून प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारास अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत पात्र लाभार्थांच्या याद्या त्यांना देय असलेले धान्य याच्या २ प्रती तयार करून स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवण्यात येणार असून, ऑक्टोबरमध्ये वाटप केलेल्य‍ा धान्याची व प्रत्येक कार्डधारकांकडून वसूल केलेल्या रकमेची माहिती स्वस्त धान्य दुकानदाराने भरून २ प्रतींत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तहसीलदारांना सादर कराव्यात, असे कवडे यांनी सांगितले.

या दराने मिळते अन्न सुरक्षा योजनेचे धान्य
अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 20 किलो गहू तीन रुपये दराने व 15 किलो तांदूळ 2 रुपये किलो दराने देण्यात येत आहे. तसेच प्राधान्य कुटुंब योजनेत प्रत्येक व्यक्त‍ीस 3 किलो गहू व 2 किलो तांदू‌ळ दोन रुपये दराने देण्यात येत आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये समाविष्ट झालेले बीपीएल लाभार्थी यांना प्रतिमाणशी 550 ग्रॅम इतके साखरेचे वितरण 13 रुपये 50 पैसे प्रतिकिलोप्रमाणे करण्यात येत आहे.