नगर- अन्न सुरक्षा योजनेला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वेळ नसल्याने डिसेंबर महिन्यात सुरू होणारी ही योजना आता पुढे ढकलण्यात आली आहे. शिधापत्रिकांवर शिक्के मारण्याचे कामही अजून पूर्ण झालेले नाही. आता जानेवारीत ही योजना सुरू करण्याचे संकेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिले.
केंद्राची ही महत्त्वाकांक्षी योजना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. 1 डिसेंबरपासून ही योजना सुरू होणार होती. मात्र, काही कारणांमुळे ती सुरू होऊ शकली नाही. लाभार्थींच्या निवडीचे निकष निश्चित करण्यासाठी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आठ मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अनिल देशमुख, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, वस्त्रोद्योगमंत्री नसीम खान यांचा समावेश होता. मात्र, चर्चा करण्यासाठी समितीला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे 1 डिसेंबरचा मुहूर्त बारगळला. नंतर देशमुख यांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही योजना सुरू करणार असल्याचे सांगितले होते.
मात्र, डिसेंबर संपण्यास अवघे सहा दिवस उरले असताना मंत्रालयातून अद्यापि योजना सुरू करण्याबाबतची सूचना जिल्हा प्रशासनाला मिळालेली नाही. योजनेसाठी लाभार्थींच्या शिधापत्रिकांवर महिला कुटुंबप्रमुख म्हणून शिक्का मारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नगर जिल्ह्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, अन्य जिल्ह्यांमध्ये शिक्के मारण्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे राज्य सरकारने शिक्के मारण्यासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांना योजनेचा प्रारंभ करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने ही योजना पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. आता ही योजना 15 जानेवारीला सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील 31 लाख 82 हजार 512 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येकाला पाच किलो धान्य मिळेल.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
अन्न सुरक्षा योजनेचा प्रारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची तारीख घेण्यात येणार आहे. जानेवारीत ही योजना सुरू होईल. योजना प्रथम मुंबई, पुणे की नाशिक जिल्ह्यात सुरू करायची याबाबत मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत चर्चा होणार आहे.’’
-अनिल देशमुख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री.
नगर जिल्ह्यातील 44 हजार लाभार्थींची यादी तयार
नगर जिल्ह्यातील लाभार्थींच्या बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकांवर महिला कुटुंप्रमुख म्हणून शिक्के मारण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता एपीएल शिधापत्रिकांवर शिक्के मारणे सुरू आहे. प्रत्येक गावातून 100 लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. शहरी भागात लोकसंख्येच्या 50 टक्के, तर ग्रामीण भागात लोकसंख्येच्या 75 टक्के लोकांना लाभ मिळणार आहे. येत्या सहा दिवसांत सर्व काम पूर्ण होईल. 44 हजार लाभार्थींच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत.’’
- सोपान कासार, जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर.