आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नधान्य वाहतुकीचा ठेका रद्द करणार ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्वस्तधान्य दुकानदारांना वेळेवर धान्य पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरु झाल्या आहेत. यापूर्वी तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. मात्र, त्यांची बदली झाल्यामुळे हा ठेका कायम राहिला.

जिल्ह्यात हजार ८३२ स्वस्त धान्य दुकाने आहेत. १० लाख ५६ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. शासकीय गोदामांतून ट्रकद्वारे स्वस्त धान्य दुकानदारांना ठेकेदारामार्फत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना वेळेवर धान्य पोहोचत नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यांपासून वंचित रहावे लागते. ठेकेदाराची वाहने वेळेवर येत नसल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. या तक्रारींची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

३० जूनला नगरच्या गोदामातून स्वस्त धान्याचे तीन ट्रक श्रीगोंद्याला निघाले होते. मात्र, त्या दिवशी ते पोहोचलेच नाहीत. याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्यावर तिसऱ्या दिवशी ते ट्रक श्रीगोंद्याला पोहोचले. दोन ट्रक नादुरुस्त झाल्याचे कारण ठेकेदाराने दिले लगेच मान्यही करण्यात आले. वास्तविक पाहता हे ट्रक निघाल्यानंतर त्यांचे नगरमधील श्री वजन काट्यावर भरलेल्या स्थितीत रात्री १०.५५ ला वजन झाले. त्यानंतर रात्री सव्वाबाराला पुन्हा रिकाम्या स्थितीत त्याच ट्रकचे वजन करण्यात आले. या प्रकरणानंतर संबंधित ठेकेदाराविरुध्द तक्रार देण्यात आली होती. या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे त्या हालचाली थंडावल्या.

यापूर्वी पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संबंधित ठेकेदार तत्कालीन पुरवठा अधिकारी सोपान कासार यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. कासार यांनी या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरुन कासार यांचीच तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव बारगळला. आता पुन्हा वाहतूक होत नसल्याच्या तक्रारी येत असून प्रशासनाने शहानिशा सुरु केली आहे. शहानिशा करुन चौकशीत तथ्य आढळल्यास संबधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

राजकीय नेत्याच्या पुत्राची भागीदारी
वाहतुकीच्याठेक्यात सत्ताधारी नेत्याच्या पुत्राची भागीदारी आहे. ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव गेल्यानंतर त्या नेत्याने मंत्रालयात जाऊन संबंधित मंत्र्यांना ठेका रद्द करु नका, असे साकडे घातले. आता पुन्हा तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे हा ठेका रद्द होणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

धान्य मिळत नसल्यास थेट तक्रारी करा
ज्या स्वस्त धान्य दुकानदारांना वेळेवर धान्य मिळत नाही, त्यांनी थेट तक्रारी कराव्यात. त्यांची दखल घेतली जाईल. प्रत्येक गावात दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांत असलेल्या सदस्यांनी आपल्या गावात धान्य आले किंवा नाही, याबाबत दक्ष रहावे. अनिल कवडे, जिल्हाधिकारी.