आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चित्रपट लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक आहे. प्रत्येक पात्राची भाषा वेगळी असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून भाषेवर मेहनत घेतली गेली पाहिजे, असे मत हिंदी चित्रपट लेखिका मनीषा कोरडे यांनी रविवारी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले.

माउली सभागृहात आयोजित अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेनिमित्त नाट्य चित्रपट लेखन कार्यशाळेसाठी कोरडे आल्या होत्या. कार्यशाळेनंतर त्या "दिव्य मराठी'शी बोलत होत्या. मालामाल विकली, भूलभुलय्या या हिंदी चित्रपटांसह मराठीतील 'प्रेम म्हणजे प्रेम असते' या चित्रपटाचे लेखन कोरडे यांनी केले आहे. कोरडे म्हणाल्या, कुठल्याही सत्य घटनेवर आधारित चित्रपटाचे लिखाण करत असताना ते आपल्या हृदयातून लिहिले गेले पाहिजे. तसे झाले तर कुणाचा अपमान होणार नाही. चित्रपटाच्या लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. भाषेचा अभ्यास करून मेहनत घेतल्यास निश्चितच चांगल्या कथेची निर्मिती करता येते.

सध्या इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही भाषांतील एका चित्रपटाच्या कथेसाठी माझे लिखाण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय घटनेवर आधारित ही कथा आहे. या कथेवर काम करत असताना भाषेवर खूप मेहनत घेणे आवश्यक असते हे लक्षात आले. चित्रपट लेखनापूर्वी मी नाटकातून कलाकार म्हणून कामाला सुरुवात केली. "सहा बोटांचे तळहात' या प्रायोगिक नाटकात मी प्रथमच कलाकार म्हणून भूमिका केली. त्यानंतर चित्रपट लेखनाला सुरुवात केली. "तुम' या हिंदी चित्रपटासाठी पहिल्यांदा लिखाण केले. त्यानंतर "मालामाल विकली'साठी लिखाण केले, असे त्यांनी सांगितले.

मी मूळची नागपूरची आहे. नागपूरमध्ये हिंदी बोलली जाते. त्यामुळे चित्रपटांसाठी कथा लिहिणे सोपे गेले. प्रसिद्ध लेखक नीरज व्होरा यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी लेखनातील बारकावे मला शिकवले, असे कोरडे यांनी सांगितले.
'चंद्रावरचा ससा' नाटक एप्रिलमध्ये रंगमंचावर
अजित भुरे यांनी दिग्दर्शित केलेले 'चंद्रावरचा ससा' हे पहिले व्यावसायिक नाटक मी लिहिले आहे. त्याचे काम पूर्ण झाले असून येत्या एप्रिल महिन्यात हे नाटक रंगमंचावर येणार आहे. हे नाटक नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. मी लिहिलेले चित्रपटही त्यांना पसंत पडतील, अशी अपेक्षा आहे. मनीषा कोरडे, चित्रपट लेखिका.
छायाचित्र : माउली सभागृहात प्रेक्षकांशी संवाद साधताना चित्रपट लेखिका मनीषा कोरडे.