आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी सभापतींचे पिस्तूल पळवले; श्रीगोंदे तालुक्यात भरदिवसा पिस्तुलाच्या धाकाने लुटली वाहने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- तालुक्यातील लिंपणगाव व घारगावच्या राज्यमार्गावर भरदिवसा पिस्तुलाच्या धाकाने दोन वाहने शनिवारी दुपारी लुटण्यात आली. अहमदपूर (जि. लातूर) येथील माजी सभापती अशोक निवृत्ती केंद्रे यांचे पिस्तूल देखील लुटारूंनी लंपास केले. श्रीगोंदे व बेलवंडी पोलिसात वरीलप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारांचा कोणताही मागमूस हाती लागला नव्हता. पहिली घटना श्रीगोंदे-दौंड राज्यमार्गावर लिंपणगाव रेल्वे गेटच्यापुढे झाली. अहमदपूरचे माजी सभापती अशोक निवृत्ती केंद्रे हे त्यांचा पीए व एका सहका-यासमवेत पुण्याकडे जात असताना त्यांच्या टाटा सफारीला महिंद्रा एक्स युव्ही ही गाडी आडवी लावण्यात आली. गाडीतून उतरलेल्या पाच जणांनी केंद्रे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
स्वरक्षणार्थ केंद्रे यांना त्यांचे रिव्हॉल्व्हर काढले व ते लुटारूंवर रोखले तेवढ्यात एका लुटारूने केंद्रे यांच्या हातून पिस्तूल हिसकावले व त्याने केंद्रे यांनाच धमकावत त्यांच्याजवळील तीस हजार रुपये रोख, मोबाइल व रिव्हॉल्व्हर असा ऐवज घेऊन मोटारीतून पळ काढला. लुटारूंच्या वाहनाला पुढे व मागे दोन स्वतंत्र क्रमांक होते. ही घटना समजताच श्रीगोंदे पोलिसांनी नाकेबंदी केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
दुस-या घटनेत नगर-दौंड राज्यमार्गावरील घारगाव (ता. श्रीगोंदे) जवळ दुपारी तीन वाजता संतोष इंगवले या प्राथमिकशिक्षणाची मोटार (एमएच 12 सीए 8655) ही लुटण्यात आला. महिंद्रा झायलो कारमधून आलेल्या पाच तरुणांनी इंगवले यांच्या मारुती कारला त्यांचे वाहन आडवे लावले. त्याचक्षणी मारुती इंगवले यांच्या पत्नी व बहिणीने कारच्या काचा बंद केल्या.लुटारूंनी दगडांनी काचा फोडल्या. पिस्तुलाचा धाक दाखवून इंगवले यांच्याकडील रोख रक्कम पंचवीस हजार व त्यांच्या पत्नी भारती इंगवले व बहीण संगीता वागस्कर यांच्या गळ्यातील सुमारे बारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटून नेली. इंगवले यांच्यासोबत तीन लहान मुले होती. या घटनेने ते सर्वच जण भेदरून गेले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.