नगर- पारनेर तालुक्यातील ‘पिंप्री गवळी’सारख्या गावाने लोकसहभागातून उभी केलेली जलसंधारणाची व ग्रामविकासाची कामे ही अत्यंत कौतुकास्पद आहेत. त्यामुळे या गावाचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनी केले.
पिंप्री गवळी या गावाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी माजी न्यायमूर्ती कोळसे यांनी पिंप्री गवळी या गावी भेट दिली होती. आदर्श गाव योजनेत समाविष्ट असलेल्या या गावाने डोंगरावर केलेले समतल समचराचे काम, चराई बंदी, बोअर बंदी, कुहाड बंदी, दारूबंदी, तसेच गाव हगणदारीमुक्त केले. गावाच्या या सर्व उपक्रमांची कोळसे पाटील यांनी माहिती घेऊन या गावाला 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. ही मदत त्यांनी काल पिंप्री गवळी गावचे सरपंच राधुजी थोरात, उपसरपंच भाऊसाहेब रणसिंग व योगेश थोरात यांच्याकडे सुपूर्द केली.
लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याची मोहीम सध्या कोळसे राबवत आहेत.
त्यानिमित्ताने अनेक गावांना ते भेटी देत आहेत. ग्रामसभांनी ठराव करून दिल्यास त्या-त्या गावची जलसंधारणाची कामे आपण करून देणार असल्याचे या अगोदरच त्यांनी जाहीर केलेले आहे. नुकतीच कोळसे यांनी लोकसभेची निवडणूक नगर दक्षिण मतदारसंघातून लढवली होती. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतरही मतदारसंघाच्या प्रगतीसाठी बांधील राहण्याचे आश्वासन ते या माध्यमातून पाळत असल्याचे गावकयांनी सांगितले.