नगर- संदीप कोतकर वगळता नगर शहराच्या विकासाबाबत काम घेऊन एकही महापौर माझ्यापर्यंत आला नाही. राष्ट्रवादीचा महापौर तरी त्यांच्या मंत्र्यांपर्यंत गेला का, हे त्यांना विचारा, असे काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार सुधीर तांबे, प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण या वेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, शहरात काम करणारा, आमच्याशी संपर्क ठेवून विकासकामांचा पाठपुरावा करणारे प्रतिनिधित्व शहराला हवे होते. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही. मंत्रिपदाच्या कार्यकाळात संदीप कोतकर यांचा अपवाद वगळता एकही महापौर शहराचे विकासकाम घेऊन
आपल्यापर्यंत आला नाही. राष्ट्रवादीचे महापौर तरी त्यांच्या मंत्र्यांना भेटलेत का विचारा, असा सवाल थोरात यांनी केला. थोरात-विखे या काँग्रेसअंतर्गत गटांमुळे महापौर भेटले नसतील या प्रश्नावर थोरात म्हणाले, विकासासाठी दोन्ही गटांचा फायदा घ्यायला हवा होता. कोतकर यांच्या महापौर पदाचा कार्यकाळ तपासल्यानंतर सर्व बाबींचा उलगडा होईल, असे ते म्हणाले. जकात व एमआयडीसीचे प्रश्न, केडगाव पाणीपुरवठा योजना आदी कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न केले. शहराच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तीन ते चार वेळा यापूर्वी नगरला घेऊन आल्याचे थोरात म्हणाले. काँग्रेसकडे पारंपरिक मते आहेत. त्यामुळे आघाडी फुटल्याचा फायदा काँग्रेसलाच होणार आहे. निवडणुकीनंतर वेळ पडल्यास धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर पर्यायाने राष्ट्रवादीसोबतच जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेचे वातावरण इतिहासजमा झाले आहे. चॅनेल मॅनेजमेंट करत नाही, असे सांगत त्यांनी एक्झिट पोल खोटे असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात जागा वाढतील
मागच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. या वेळी या तीन जागांसह पक्षाच्या आमदारांमध्ये वाढ होणार असल्याचे थोरात म्हणाले. ज्या मंत्री, आमदारांवर टीका, आरोप करून सभागृह बंद पाडले, त्यांनाच भाजपने उमेदवारी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षाचे दिग्गज नेते जिल्ह्याकडे का फिरकले नाहीत, यावर थोरात म्हणाले, राष्ट्रीय नेत्यांनी कुठे सभा घ्याव्यात यालाही मर्यादा आहेत.