नगर- संगमनेरमध्ये आम्ही विकास करून दाखवला. आता नगरच्या भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. नगर शहराचे भविष्य घडवायचे असेल, तर जोमाने काम करणाऱ्या सत्यजित तांबे यांच्यासारख्यांची गरज आहे. तो नगरकर बनून काम करेल याची हमी मी घेतो, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
काँग्रेसचे उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारासाठी दिल्ली दरवाजा व भिस्तबाग येथे रविवारी (12 ऑक्टोबर) झालेल्या जाहीर सभेत थोरात बोलत होते. पक्षाचे प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, धनंजय जाधव, गौरव ढोणे, ऋत्विक जोशी, मुदस्सर शेख, अभिजित लुणिया, सविता मोरे आदी यावेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, शहराच्या विकासासाठी संघर्ष करण्याची सत्यजितची तयारी आहे. नगरकरांच्या सुख-दु:खात तो सहभागी होईल. शहराच्या विकास प्रक्रियेत तो तळमळीने सक्रिय सहभाग देईल. त्याच्या मनात शहर विकासाच्या अनेक संकल्पना आहेत. या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी त्याला साथ देण्याची गरज आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून त्याची नगरशी नाळ जुळली आहे. शहरातील अनेक प्रश्न जाणून घेण्याचा त्याने प्रयत्न केला असून ते सोडविण्यासाठी तो कटिबद्ध आहे. शहरातील रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा लागणार आहे, असे थोरात म्हणाले.