आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Minister Balasaheb Thorat,latest News In Divya Marathi

थोरात यांना निवडणूक अधिका-यांची नोटीस, सादर केलेल्या व कक्षाने नोंदवलेल्या खर्चात तफावत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- उमेदवाराने सादर केलेला खर्च व सनियंत्रण कक्षाने नोंदवलेल्या खर्चात तफावत आढळल्याने माजी मंत्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांना निवडणूक निर्णय अधिकारी संदीप निचित यांनी नोटीस बजावली. स्पर्धेतील इतर उमेदवारांच्या तुलनेत थोरात यांचा बुधवार (3 ऑक्टोबर) पर्यंतचा खर्च 3 लाख 1 हजार 213 रुपये असा सर्वाधिक आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पडताळणी निवडणूक खर्च निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. संगमनेरमधून एकूण दहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांनी सादर केलेला खर्च व संनियंत्रण कक्षाने नोंदवलेल्या खर्चाची पडताळणी याची गुरुवारी (9 ऑक्टोबर) पुन्हा करण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत निवडणूक खर्चाची आकडेवारी सादर करणाऱ्या उमेदवारांपैकी माजी मंत्री थोरात यांच्या खर्चात सनियंत्रण कक्षाला गुरुवारी (25 सप्टेंबर) तब्बल 37 हजार 974 रुपये व रविवारी (28 सप्टेंबर) 2 हजार 180 रुपये खर्च कमी नोंदवल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे थोरात यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी (6ऑक्टोबर) सदर खर्च आपल्या सादर केलेल्या खर्चात का धरण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस देत खुलासा मागितला आहे.
निवडणुकीतील अन्य उमेदवारांनी दिलेल्या खर्चाचा तपशील पुढीलप्रमाणे - आबासाहेब संभाजीराव थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) 73,450 रुपये, जनार्दन म्हातारबा आहेर (शिवसेना) 1,27,071 रुपये, अ‍ॅड. प्रकाश कचरू आहेर (बसप) 16,181 रुपये, राजेश माधव चौधरी (भारतीय जनता पक्ष) 90,475 रुपये, कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना) 11000 रुपये, अविनाश हौशीराम भोर (अपक्ष) 10200 रुपये, अण्णासाहेब सोपान दिघे (अपक्ष) 13,333 रुपये, यासर मोहमंद शेख (अपक्ष) 13,650 रुपये व सुनीता जयप्रकाश बेल्हेकर (अपक्ष) 12,400 रुपये. दरम्यान, जिल्ह्यातील अन्य 11 विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाबाबतही शहानिशा सुरू असून काहीजणांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात व्यवस्थित केले जाते की नाही, यावर निवडणूक अधिकारी व निरीक्षक बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आचारसंहितेचा भंग झाल्यास तातडीने संबंधितांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यामुळे उमेदवार धास्तावले आहेत.

माहितीची अधिका-यांनी केली टाळाटाळ
उमेदवारांनी नोंदवलेल्या निवडणूक खर्चाची माहिती घेण्यासाठी निवडणूक खर्च संनियंत्रण समितीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी पत्रकारांनी संपर्क साधला असता अधिका-यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. निवडणूक निर्णय अधिकारी संदीप निचित यांनी संबंधितांना सांगूनही त्यांनी ही कायदेशीर बाब असल्याने उद्या काही उदभवू शकत असल्याने माहिती उघड करता येत नसल्याचे सांगितले. संबंधित माहिती अधिका-यांनी काचफलकात व आयोगाकडे दिल्याचे सांगितल्यानंतरही संबंधित अधिकारी माहिती टाळत लपवाछपवी करत असल्याचे निदर्शनास आले.