आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार वसंतराव झावरे यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर- माजी आमदार वसंतराव कृष्णराव झावरे यांचे गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नगर येथील आनंदॠषिजी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्यामागे माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे, अभियंता सुदेश, मुलगी सुचेता, पत्नी सुप्रिया, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. जन्मगावी वासुंदे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

झावरे हाडाच्या कॅन्सरमुळे आजारी होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर किमान सहा महिने उपचारांची गरज भासणार नाही, डॉक्टरांनी सांगितले होते. मधुमेहाचाही त्रास असल्याने झावरे यांची प्रकृती साथ देऊ शकली नाही.

१४ जुलै १९४३ रोजी जन्मलेल्या वसंतराव झावरे यांच्याकडे स्वयंभू राजकारणी म्हणून पाहिले जात होते. भूविकास बँकेत नोकरीस असतानाच समाजाशी असलेल्या बांधिलकीतून त्यांनी १९७९ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून ती जिंकली. लगेच पंचायत समितीचे सभपती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. सलग १२ वर्षे ते पंचायत समितीचे सभापती होते. नंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांची उमेदवारी कापली. त्यांच्या आदिवासी कार्यकर्त्यास पंचायत समितीची उमेदवारी देण्यात येऊन प्रतिस्पर्ध्यांनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्या काळात काँगेसची उमेदवारी म्हणजे हमखास अशी स्थिती असतानाही झावरे यांनी आदिवासी कार्यकर्त्यास उमेदवारी नाकारण्याचा सल्ला देत स्वतः झावरे, आदिवासी कार्यकर्ता, तसेच दुसऱ्या गणातून महिला उमेदवाराने अपक्ष निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत झावरे यांच्यासह इतर दोन्ही उमेदवार विजयी झाले. १९९५ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी मंत्री शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे यांच्या प्रयत्नाने झावरे यांना काँग्रेसची विधानसभेची उमेदवारी मिळाली. बाळासाहेब विखे यांचे खंदे समर्थक तत्कालीन आमदार नंदकुमार झावरे यांनी त्यांच्याविरोधात अपक्ष म्हणून शड्डू ठोकले, तरीही वसंतराव विजयी झाले. सन २००० च्या निवडणुकीतही त्यांनी विजय संपादन केला.

तालुक्याचे स्वयंनेतृत्व : हजारे
वसंतरावझावरे यांच्या रूपाने तालुक्याला पहिले राजकीय नेतृत्व मिळाले. त्यांच्यामुळे तालुक्याला स्वयंनेतृत्वाची सवय निर्माण झाली. त्यामुळेच आज स्वयंनेतृत्वाचा अभाव जाणवत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
वेगळे राजकीय विचार असले, तरी आम्ही कौटुंबिक, राजकीय पातळीवर कधीही कटुता निर्माण होऊ दिली नाही. मतदारसंघातील जनतेच्या वतीने आपण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे आमदार विजय औटी म्हणाले.