आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्ल्यांचा इतिहास युवा पिढीने आपलासा करावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जाज्वल्य पराक्रमाचा, कल्पकतेचा, कला कौशल्याचा इतिहास विविध किल्ल्यांच्या माध्यमातून आजही साक्ष देत आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा युवा पिढीने आपलासा करावा, असे आवाहन इतिहास अभ्यासक संगीता कळसकर यांनी शनिवारी केले.

हौशी छायाचित्रकार ठाकूरदास परदेशी यांनी काढलेल्या राज्यातील किल्ल्यांच्या ‘दुर्ग नावाचा जिवंत इतिहास’ या सुरवि आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कळसकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नाट्यकलाकार व चार्टर्ड अकाउंटंट राजेंद्र काळे, उद्योजक किशोर मुनोत, मुक्त छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय दळवी, दत्तात्रय आसने, सुरविचे विजय जुंदरे, रवी पाटोळे उपस्थित होते. कळसकर म्हणाल्या, प्रत्येक किल्ल्याच्या उभारणीमागील व नंतरच्या कारकिर्दीतील इतिहास जाणून घेणे ही काळाची गरज आहे.

छत्रपती शिवरायांचे ‘हिंदवी स्वराज्य’ व तत्कालीन विविध साम्राज्याचा इतिहास हा किल्ल्यांच्या माध्यमातून प्रकट होतो. जगभरात या किल्ल्यांची दखल घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रात शासन व नागरिकांत याबद्दल अनास्था आहे. स्वयंसेवी संस्था, निसर्गप्रेमींनी यात सहभाग घेऊन युवा पिढीला यात जागृत केले, तरच हा वारसा टिकू शकेल. सुरविने यासाठी आयोजित केलेले हे प्रदर्शन प्रबोधनात्मक ठरेल, असा आशावाद व्यक्त करून त्यांनी छायाचित्रकार परदेशी यांना शुभेच्छा दिल्या. काळे म्हणाले, केवळ वास्तू म्हणून नव्हे, तर त्या किल्ल्यांचा इतिहास जाणून घेतला, तर त्यातून जास्त आपलेपणा तयार होईल. त्यादृष्टीने दृकर्शाव्य, छायाचित्र माध्यमातून या वास्तूपरिसरात नियोजन होणे गरजेचे आहे. हे प्रदर्शन 12 नोव्हेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत चितळे रस्त्यावरील सुरवि लॅब येथे सुरू राहणार आहे. कोमल सावंत यांचा नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. आभार सुरेश मैड यांनी मानले.