आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्ला स्वच्छतेसाठी सरसावले विद्यार्थी..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कोणताही उत्सव झाला की, दुसर्‍या दिवशी उरतो तो कचरा. प्रजासत्ताक दिनी हजारो नगरकरांनी ऐतिहासिक भुईकोट किल्ला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जणू काही तेथे यात्राच भरली होती. खाद्यपदार्थांचे, चॉकलेट-बिस्किटांचे रॅपर, प्लास्टिकच्या पिशव्या, आईस्क्रिमच्या काड्या, पाण्याच्या व शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सर्वत्र पडला होता. हा कचरा साफ केला महाविद्यालयीन युवक-युवतींच्या एका गटाने.

चित्रकार योगेश हराळे यांनी पुढाकार घेऊन ‘अहमदनगर फोर्ट’ नावाचे पेज फेसबुकवर अपलोड केले आहे. किल्ल्याच्या जतनाचे काम सुरू होऊन पर्यटकांसाठी तेथे पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, टुरिस्ट गाईड यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्वांनी मिळून पाठपुरावा करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून सोमवारी किल्ल्यात स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. म्हसणेफाटा येथील र्शीसर्मथ अँकॅडमी ऑफ पॉलिटेक्निकचे सुमारे 60 विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. पॉलिटेक्निकचे प्राचार्य राजेंद्र थोरात, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य गोकुळदास लोखंडे, संचालक कैलास गाडीलकर, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. संकेत पोखरणा, प्रा. पूजा कोहोक, प्रा. शुभांगी दलाल, योगिता कोकरे यावेळी उपस्थित होते.

सकाळी दहाच्या सुमारास किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर स्वच्छता मोहीम सुरू झाली. अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत सर्वांनी मिळून परिसर स्वच्छ केला. नंतर राष्ट्रध्वज फडकत असलेल्या बुरुजापासून नऊ क्रमांकाच्या निशाण बुरुजापर्यंतची तटबंदी स्वच्छ करण्यात आली. या मोहिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी किल्ल्याचा इतिहासही जाणून घेतला. ‘चले जाव’ आंदोलनाच्या वेळी पंडित नेहरू, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल आदी बारा नेत्यांना जेथे स्थानबद्ध करण्यात आले होते, त्या ‘नेता कक्षा’ला भेट देऊन राष्ट्रीय नेते व क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली. भूषण देशमुख यांनी किल्ल्याची माहिती सांगितली. या मोहिमेसाठी लष्करी जवानांचे सहकार्य लाभले.

फेसबुकवरील ‘अहमदनगर फोर्ट’ला चांगला प्रतिसाद
‘अहमदनगर फोर्ट’ या फेसबुकवरील पेजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन दिवसांत हजारापेक्षा जास्त जणांनी हे पान पाहिले. अनेकांनी ‘लाईक’ केले. काहींनी प्रतिक्रिया नोंदवत या उपक्रमात आम्ही सक्रिय सहभाग नोंदवू इच्छितो असे सांगितले. नगरकरांनी मनावर घेतले, तर किल्ल्याचे रखडलेले काम सुरू होऊ शकेल, हेच या प्रतिसादावरून स्पष्ट झाले. किल्ला दररोज सकाळी 9 ते 5 या वेळात पाहण्यासाठी खुला असतो. नागरिकांनी किल्ल्याला जरूर भेट द्यावी, असे आवाहनही हराळे यांनी केले.