नगर - सरत्या आठवड्यात जिल्ह्यात खुनाचे चार प्रकार घडले. लागोपाठ घडलेल्या खूनसत्रामुळे पोलिस चक्रावले. पण तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यामुळे तीन प्रकरणांतील आरोपी काही तासांतच अटक झाले. विशेष म्हणजे लागोपाठ झालेल्या चारही खुनांमागील नाजूक कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनांमध्ये आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली, तरी थेट खून करण्यापर्यंत त्यांची मजल गेल्यामुळे पोलिसही चकीत झाले. लागोपाठ या चारही खून प्रकरणामुळे गुन्हेगारीचे नवेच रूप समोर आले आहे.
राहुरीत एका जन्मदात्याने १७ वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. तिच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे पित्याने तिला वेळोवेळी समज दिली. पण तरीही तिच्या वागणुकीत सुधारणा नव्हती. एके रात्री पित्याला जाग आली, तेव्हा मुलगी घरात नव्हती. तिचा शोध घेऊनही सापडली नाही. पहाटे मुलगी घरी परतल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. मुलीकडून समाधानकारक उत्तरे मिळाल्यामुळे पित्याने तिचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून काही तासांतच आरोपी पित्याला गजाआड केले.
नंतर नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे हॉटेलमध्ये वेटर असलेल्या एका युवकाचा खून झाला. वेटरचे शेजारच्या इसमाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली. या संबंधांची कुणकुण लागल्यामुळे पतीचे वेटरसोबत वाद झाले. नंतर पतीने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत वेटर बेशुद्ध झाला. सोनई पोलिसांनी सुरुवातीला "हाफ मर्डर'चा गुन्हा नोंदवला. उपचार सुरू असताना वेटर मृत्यू पावल्यामुळे नंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील आरोपीही गजाआड झाला आहे.
खुनाची तिसरी घटना नगर तालुक्यातील सोनेवाडी शिवारात घडली. एका व्यक्तीच्या डोक्यात टणक हत्याराने वार करून त्याचा खून झाला. मृताची ओळख पुसण्यासाठी आरोपींनी त्याच्या चेहर्यावर रासायनिक द्रव्य टाकून चेहरा विद्रूप केला. सुदैवाने मृतदेहाची ओळख लवकर पटली. संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली. हा खूनही अनैतिक संबंधातूनच घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित आरोपींची चौकशी केल्यावर अंदाज खरा ठरेल, असा पोलिसांना विश्वास आहे.
टोकाला जाण्यापूर्वी मानसिक सल्ला आवश्यकच
अनैतिक संबंध सहजपणे स्वीकारण्याची सामाजिक परिस्थिती
आपल्याकडे नाही. बर्याचदा "इगो' िकंवा "स्टेटस'ला धक्का लागताच लोक उद््विग्न होतात. संशयी वृत्ती वाढून विध्वंसक होतात. त्यामुळे एरवी सामान्य वाटणारी माणसे मानसशास्त्रीय भाषेत "पॅरानॉईड पर्सनॅलिटी डिसॉर्डर'ने ग्रस्त असतात. म्हणूनच कायदा हातात घेण्यापर्यंत त्यांची मजल जाते. अशा लोकांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी चांगला मानसिक सल्ला घेतला, तर त्यांची समस्या नक्कीच सुटू शकते.'' सुकन्या फणसाळकर, मनोविकास तज्ज्ञ, नगर.
त्या घटनेत "तसेच' कारण
नगर-औरंगाबादमहामार्गालगत जेऊर शिवारात नगरमधील एका सराफाचा खून झाला. पोलिसांनी वेगाने तपास करत वांबोरी गावातून एका युवकाला अटक केली. प्राथमिक चौकशीत सराफाच्या खुनामागेही "तसे'च कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. जबरदस्तीने ठेवलेले अनैसर्गिक संबंध असह्य झाल्यामुळे आपण त्याचा खून केला, अशी कबुली युवकाने पोलिसांना दिली आहे.
पार्श्वभूमी सामान्यच
खुनाच्या चारही घटनांमध्ये संशयित म्हणून ज्यांची नावे समोर आली, आरोपी म्हणून ज्यांना अटक केली, त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आराेपींवर यापूर्वी अदखलपात्र गुन्ह्याचीही नोंद नाही, तरीही त्यांनी थेट खून केला. चारही खुनांमागील कारणे नाजूक आहेत. कारणे प्रत्यक्ष परिस्थिती काहीही असली, तरी प्रथमदर्शी अशा घटनांमुळे लोकांना कायद्याचा धाक उरलेला नाही, हेच स्पष्ट होत आहे.