आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी गोळीबार केंद्रापर्यंत घुसलेले 4 संशयित अटकेत; एकाने केले पाकिस्तानात कॉल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलच्या ‘बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट’मध्ये चार युवकांनी गुरुवारी थेट गोळीबार केंद्रापर्यंत घुसखोरी केल्याचे जवानांच्या लक्षात आले. त्यांना पकडून पोलिसांकडे देण्यात आले. यापैकी मुख्य संशयिताच्या मोबाइलमध्ये थेट पाकिस्तान, बांगलादेश व इराणच्या क्रमांकाशी अनेकदा संभाषण झाल्याचे आढळल्याने या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे. या चौघांवर विनापरवानगी लष्कराच्या केंद्रात घुसल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. लष्करी अधिकारी व पोलिसांनी तब्बल दहा तास चौकशी केली.

ख्वाजा मख्तुम शेख (२३, जवळी लोहारा, उस्मानाबाद), शहानवाज इस्माईल कुरेशी (२०, नळदुर्ग, कुरेशी गल्ली, उस्मानाबाद), इम्रान कारभारी मुस्तफा (२१, सय्यद हिप्परगा, लोहारा, उस्मानाबाद) व दौलसा मख्तुम शेख (२३, जोवाली लोहारा, उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. भिंगार कॅम्प परिसरातील लष्करी हद्दीत असलेल्या बेसिक ट्रेनिंग रेजिमंेटच्या परिसरात गुरुवारी  या चौघांनी कुंपणावरून उड्या मारून प्रवेश केला. ‘बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट’मधील गोळीबार केंद्रात हे चौघे बसले होते. लष्कराचे जवान विजेंद्र सिंह, ए. एल. डी. फुलाराम, जरनैल सिंह, संदीप वाबळे, अभिषेक प्रताप हे चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारावर ड्यूटीवर होते. गस्त घालत असताना जवानांनी या युवकांना पाहिले.त्यांनी तत्काळ युवकांना ताब्यात घेतले. एका युवकाला यापूर्वीही या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई असल्याचे सांगूनही ते आत आल्यामुळे त्यांना पकडून वरिष्ठांपुढे हजर करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या युवकांची कसून चौकशी करत त्यांच्या ओळखपत्राची विचारणा केली. प्राथमिक चौकशीत युवकांनी व्यवस्थित उत्तरे न दिल्याने त्यांची झडती घेण्यात आली. चौघांपैकी एकाकडे आधार कार्ड सापडले. सर्वांनी त्यांची नावे लष्करी अधिकाऱ्यांना सांगितली. लष्करी परिसरात अपराध करण्याच्या उद्देशाने हे युवक आल्याचा संशय बळावल्याने जवानांनी पोलिसांना घटनेची कल्पना दिली. युवकांना घेऊन त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गाठले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, सहायक अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, सहायक निरीक्षक विनोद चव्हाण, कैलास देशमाने, दहशतवादविरोधी पथक, गुप्तचर विभागाचे अधिकारीही तेथे आले. चारही युवकांची पुन्हा सुमारे सहा तास कसून चौकशी करण्यात आली. शुक्रवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. परवानगी नसतानाही अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा गुन्हा युवकांवर नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुपमधील संभाषण उर्दूतून
लष्करी अधिकारी व पोलिसांनी केलेल्या चौकशीत युवकांबद्दल धक्कादायक माहिती समोर आली. अटक केलेल्या युवकांकडे आढळलेल्या मोबाइलमध्ये पाकिस्तानसह इतर राष्ट्रांतील काही फोन नंबर सेव्ह केलेले होते. युवकांच्या व्हॉट्सअॅपमध्येही पाकिस्तानातील काही ग्रुप आढळले. त्यातील बहुतांश संभाषण उर्दू भाषेत करण्यात आलेले आहे. एक युवक एमआयडीसीतील जैविक कारखान्यात विक्री प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्याला या भागात दुसऱ्यांदा पकडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

‘बीटीआर’च्या कुंपणाची दुरवस्था
चौघांनी जेथून प्रवेश केला ते ठिकाण औरंगाबाद महामार्गावर वसंत टेकडीसमोर आहे. येथील पूर्वीचा रस्ता आता बंद आहे. भिंतही तीन फुटांपेक्षा उंच नाही. त्यामुळे ती कोणीही ओलांडू शकतो. मुकुंदनगर परिसरही ‘बीटीआर’ला लागूनच आहे. या भागाततही तीच स्थिती आहे. त्यामुळे ठरावीक अंतरावर टेहळणी मनोरे उभारल्यास लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे.

सुरक्षेतील उणिवा उघड
आर्मड कोअर सेंटरमधील गोळीबार केंद्राचा परिसर अतिशय संवेदनशील आहे. तरीही हा प्रकार घडल्याने सुरक्षेतील उणिवाही समोर आल्या. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे सहज लष्करी भागात प्रवेश करणे ही गंभीर बाब आहे. हे युवक नेमके कशासाठी आत आले, त्यांचा हेतू काय होता, ही बाब तपासात समोर येईलच. मात्र, जितक्या सहजपणे त्यांनी लष्करी हद्दीत प्रवेश केला त्यावरून सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बातम्या आणखी आहेत...