आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fourth Anniversary Of Divya Marathi Ahamednagar Celebrated

दिव्य मराठी अहमदनगरचा वर्धापन दिन, टंचाईग्रस्त गावात पाण्याबाबत प्रबोधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर : ' दैनिक ‘दिव्य मराठी’च्या अहमदनगर आवृत्तीचा चौथा वर्धापनदिन रविवारी नगर तालुक्यातील घोसपुरी येथील पद्मावती मंदिरात पाण्यासंदर्भात प्रबोधन आणि गावकऱ्यांसोबत स्नेहभोजनाने साजरा करण्यात आला. यापूर्वी कधीही कोणत्याही माध्यमाचा वर्धापनदिन अशा अभिनव आणि विधायक पद्धतीने साजरा झालेला नव्हता. त्यामुळे सकारात्मकता आणि अभिनव उपक्रमांची ‘दिव्य मराठी’ची परंपरा या निमित्तानेही मान्यवरांकडून वाखाणली गेली.
‘दिव्य मराठी’तर्फे यंदा जिल्ह्यात असलेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन टंचाईग्रस्त गावात कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी घोसपुरी हे गाव निवडण्यात आले. नगर येथील कलाकार देविप्रसाद सोहोनी यांच्या ‘आता कशाला उद्याची वाट?’ या एकपात्री विनोदी पण पाण्याविषयी प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाने सोहळ्याला सुरुवात झाली. त्यावर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी ग्रामविकास व चारित्र्यवान गाव याबाबत मार्गदर्शन करून कळस चढवला. त्यानंतर ग्रामस्थांसह स्नेहभोजन घेण्यात आले. सुमारे दोन हजार ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक दीपक पटवे यांनी या उपक्रमामागील भूमिका मांडली. एक वर्ष या गावाकडे विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पुढील वर्षी या गावात येताना दुष्काळी गाव, अशी ओळख पुसली जाऊन राळेगणसिद्धी व हिवरेबाजारप्रमाणे याची ओळख आदर्श गाव म्हणून व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कवडे यांनी फक्त विकासापेक्षा सुख, समाधानासाठी सचोटी, प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे आग्रही प्रतिपादन केले. ग्रामविकास, बालिकेच्या जन्माचे स्वागत, पाण्याची काटकसर, तंटामुक्ती याबाबत त्यांनी आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले. दिव्य मराठीचे सरव्यवस्थापक (पुणे) शैलेश पाटील देखील यावेळी उपस्थित होते. खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सदस्य बाळासाहेब हराळ यांनी घोसपुरीला येऊन ‘दिव्य मराठी’ला शुभेच्छा दिल्या.
अहमदनगर पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर, उपसरपंच प्रभाकर घोडके यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.