आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिव्यांच्या कामांतील गैरव्यवहार उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील विविध भागात करण्यात आलेल्या विद्युतीकरणाच्या (पथदिवे एलईडी) कामात गैरव्यवहार झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रक समितीने आठ दिवसांपूर्वी आयुक्तांना सादर केलेल्या लेखा परिक्षण अहवालात पथदिव्यांच्या कामात अनेक त्रृटी असल्याचा ठपका ठेवला आहे. गरज नसताना कामाचे अंदाजपत्रक लाखो रुपयांनी फुगवण्यात आले, मोजमाप पुस्तकात कामाच्या बोगस नोंदी घेण्यात आल्या असल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पथदिव्यांच्या कामातील गैरव्यवहार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
युतीच्या सत्ताकाळात नगरोत्थान अभियानांतर्गत शहरात सुमारे दहा कोटींची विद्युतीकरणाची कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी पूर्ण झालेल्या ६० टक्के कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. पाइपलाइन रोड, मनमाड रोड, कायनेटीक चौक ते ट्रॅपिक आॅफिस, मुकूंदनगर, केडगाव, तसेच शहरातील वेगवेगळे अंतर्गत रस्ते, चौक आदी ठिकाणी पथदिव्यांसह एलईडी दिवे बसवण्यात आले. त्यामुळे शहर काही प्रमाणात उजळून निघाले असले, तरी या कामाचा जास्तीत जास्त मोबदला ठेकेदार, पदाधिकारी काही अधिकाऱ्यांच्या खिशात गेला. या कामातील गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर आल्यानंतर नगरोत्थान अभियानाचे प्रकल्प अधिकारी तथा तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडीट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे येथील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयामार्फत पथदिव्यांच्या कामाचे तांत्रिक लेखा परीक्षण (आॅडिट) करण्यात आले. त्यासाठी मनपाने लाख १३ हजार ५२३ रुपयांचे शुल्क संबंधित महाविद्यालयाला दिले होते. महाविद्यालयाने लेखा परीक्षणाचा ९० पानी अहवाल मनपा प्रशासनाला सादर केला. परंतु त्यात पथदिव्यांच्या कामातील केवळ किरकोळ दोष दाखवून ठेकेदारांना पाठीशी घालण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (विद्युत) गुणनियंत्रक समितीमार्फत या कामाचे पुन्हा लेखा परिक्षण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मोहळे यांनी मनपाकडे केली होती. मात्र, सर्व कामांच्या लेखा परिक्षणाचे शुल्क परवडणारे असल्याने मनपाने उदाहरणादाखल केवळ पाइपलाइन रस्त्यावरील पथदिव्यांच्या कामाचे लेखा परिक्षण करण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली होती. बांधकाम विभागाच्या पाच सदस्यांच्या गुणनियंत्रक समितीने या कामाचे लेखा परिक्षण करून आयुक्त विलास ढगे यांना २० जानेवारी २०१६ ला अहवाल सादर केला आहे. त्यात पाइपलाइन रस्त्यावरील पथदिव्यांचे अंदाजपत्रक लाख ८५ हजार ७४० रुपयांनी फुगवले असल्याचा ठपका ठेवला आहे. मोजमाप पुस्तकात बोगस नोंदी घेण्यात आल्याचे समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. गुणनियंत्रक समितीने पाइपलाइन रस्त्यावरील पथदिव्यांचे लेखा परिक्षण केले असले, तरी सर्वच कामांत त्रृटी आहेत. त्यामुळे आयुक्त ढगे आता या अहवालाबाबत काय कार्यवाही करतात, याकडे लक्ष लागले आहे.

गुणनियंत्रक समिती
व.आ. गावित (सहायक मुख्य अभियंता तथा समिती अध्यक्ष), नं. ज. महाजन (विद्युत निरिक्षक तथा सदस्य), दि. बा. थोरात (उप संचालक तथा सदसय), सं. रा. पुजारी (सहायक विद्युत निरिक्षक तथा सदस्य), बी. टी. मंडलिक (शाखा अभियंता तथा सदस्य सचिव).

}कामाचे (पाइपलाइन रोड) अंदाजपत्रक ७,८५,७४० रुपयांनी फुगवण्यात आले.
} कामाच्या मोजमाप पुस्तकात बोगस नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.
} वीज वाहक तारांची अनावश्यक जाडी वाढवण्यात आलेली आहे.
} मोजमाप पुस्तकातील नोंदीप्रमाणे प्रत्येक्षात काम झालेले नाही.

"तंत्रनिकेतन'चा अहवाल
१७७० पैकी ८०० एलईडी दिवे बसवले जून्याच पोलवर
अनेक ठिकाणचे अर्थिंगचे पोल वाकलेले आहेत
वितरीका टायमर बॉक्स नाहीत
अर्थिंग वायर साध्या क्राँक्रीटीकरणात गाडली
ट्रॅफिक आॅफीस पर्यंत पोलचे फाऊंडेशन कमकुवत
रेल्वे पुलावरील वायर उघड्यावर
डीएसपी चौक ते सनी हॉटेल पर्यंतचे काम अपूर्ण
नेप्ती चौक ते कल्याण रोडपर्यंतचे काम अपूर्ण
एलईडी दिवे कमी-जास्त उंचीवर बसवले
अनेक ठिकाणी पोल, क्लॅम्प ब्रॅकेटला रंग नाही
पोलची फिटींग उघड्यावर धोकादायक पध्दतीने केली

मनपाचा चुकीचा पायंडा
शासन निर्णयानुसार (८ नोव्हेंबर २०१०) महापालिका हद्दीत करण्यात येणाऱ्या मोठ्या विकासकामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखा परीक्षण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद संबंधित कामांच्या निविदेत असणे आवश्यक आहे. लेखा परीक्षण झाल्याशिवाय संबंधित ठेकेदारांना कामाची बिले देण्यात येऊ नयेत, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. असे असतानाही नगर महापालिकेने लेखा परिक्षण करताच ठेकेदारांना बिले देण्याचा चुकीचा पायंडा पाडला आहे. पथदिव्यांच्या कामाबाबतही तेच झाले आहे.

दिव्याखाली अंधार
कोट्यवधी रुपये खर्च करून बसवलेले अनेक पथदिवे एलईडी दिवे वर्षभरात बंद पडले आहेत. संबंधित ठेकेदार कंपन्यांनी सलग दोन वर्षे दिव्यांची देखभाल दुरूस्ती करणे बंधनकारक आहे, तसा करारनामाही केला. परंतु बिले हातात पडताच या ठेकेदारांनी पळ काढला. त्यामुळे अनेक पथदिवे दुरूस्तीविना बंद आहेत. मनपा पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांना पाठीशी घातले आहे. एका ठेकेदाराला तर झालेल्या कामाचे बिल देण्याचा पराक्रमही मनपाने केला. यावरून पथदिव्यांच्या गैरव्यवहारात प्रशासनाचाही हात असल्याचे स्पष्ट होते.

अहवालाबाबत माहिती नाही
^बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रक समितीने सादर केलेल्या अहवालाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. समितीने हा अहवाल आयुक्तांकडे सादर केला असेल, त्यामुळे या अहवालाबाबत मी काहीच बोलू शकत नाही.'' आर. जी. सातपुते, विद्युतविभागप्रमुख मनपा.

हे आहेत ठेकेदार
}उरमुडेइलेक्ट्रोमेक (अहमदनगर)
} यश इलेक्ट्रोलाईन (पिंपरी चिंचवड)
} अमित इंजिनिअर्स (औरंगाबाद)
} एस. एस. इलेक्ट्रीक (डोंबिवली)

फौजदारी कारवाई करा
^मनपाने उदाहरणा दाखल पाइपलाइन रस्त्यावरील पथदिव्यांच्या कामाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रक समितीमार्फत पुन्हा एकदा लेखा परिक्षण केले. समितीने सादर केलेल्या अहवालात अनेक बाबींवर ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधित दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होण्यासाठी हा अहवाल पुरेसा आहे. आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करून ठेकेदारांकडून पैसे वसुल करावेत, अन्यथा तत्कालिन आयुक्त विजय कुलकर्णी यांच्यासह ढगे यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.'' प्रमोद मोहळे, अध्यक्ष,सन्माननीय नागरिक प्रतिष्ठान.