आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंबरी बाळापूर सेवा सोसायटीत 12 लाखांचा अपहार; 26 जणांवर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत बारा लाख रुपयांचा अपहार केल्याच्या कारणावरून तत्कालीन संचालक मंडळाविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सर्मथक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तब्बल 26 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली.

संस्थेचे लेखा परीक्षक बाबासाहेब शंकर पगारे (कोपरगाव) यांनी याप्रकरणी सोमवारी रात्री फिर्याद दिली. मुख्य आरोपींमध्ये प्रवरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ यांच्यासह जिल्हा बँकेच्या आश्वी बुद्रूक शाखेचे शाखाधिकारी बाळासाहेब शेळके यांचा समावेश आहे.

1 एप्रिल 2006 ते 31 मार्च 2011 या पाच वर्षांच्या कार्यकाळात संचालक मंडळाने 12 लाख 5 हजारांचा अपहार स्वत:च्या फायद्यासाठी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लेखापरीक्षणात ही बाब समोर आली. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कर्मचारी व संचालकांसह अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आश्वी शाखेच्या शाखाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचे लेखापरीक्षकांच्या तपासणीत समोर आले. शाखाधिकारी शेळके यांनी अपात्र ठरलेल्या सभासदांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळवून देऊन संस्थेची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. या संदर्भात प्रथमत: संगमनेर न्यायालयात तक्रार करण्यात आली. न्यायालयाकडून हा गुन्हा तालुका पोलिसांकडे तपासासाठी पाठवण्यात आला. पाच वर्षांच्या काळात संचालक मंडळाने केलेल्या अपहाराबद्दल तक्रार दाखल झाल्याने राज्यभर नावाजलेल्या येथील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, तपास अधिकारी धारबळे मंगळवारी नगर येथे गेल्याने कोणत्याही आरोपीला अटक झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.