आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त सैनिकांच्या सर्व अडचणी सोडवू; लेफ्टनंट जनरल मेहता यांची ग्वाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ज्यांना निवृत्तीवेतन नाही अशा निवृत्त सैनिकांना येणार्‍या अडचणींची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती नगरच्या आर्र्मड कोअर सेंटर अँड स्कूलचे (एसीसी अँड एस) कमांडंट लेफ्टनंट जनरल अशोककुमार मेहता यांनी रविवारी दिली.

नगर, बीड, लातूर, सोलापूर व उस्माबाद या पाच जिल्ह्यांतील निवृत्त सैनिक, वीरमाता व वीरपत्नींचे संमेलन एसीसी अँड एसमध्ये आयोजित करण्यात आले होते. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच झाला. लष्करातर्फे हे वर्ष देशभर ‘सेवानिवृत्त सैनिक वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे.

हजारो निवृत्त सैनिक व त्यांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. त्यांना मार्गदर्शनात लेफ्टनंट जनरल मेहता बोलत होते. ते म्हणाले, आपल्या सैनिकी जीवनातील सुवर्णक्षणांशी आपल्याला पुन्हा जोडणे, तसेच निवृत्तीनंतर सैनिकांना येणार्‍या अडचणींची माहिती घेऊन त्या सोडवणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. सैनिकांना लागणार्‍या आवश्यक त्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करणे, तसेच लष्कराकडून त्यांच्यासाठी ज्या नवीन योजना येत आहेत, त्यांची माहिती देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी एसीसी अँड एस व एमआयआरसीतील निवृत्त सैनिकांच्या मुलांसाठी उपलब्ध असलेल्या बॉइज स्पोर्टस कंपनी, वसतिगृह, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आदी सुविधांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

शहीद जवानांच्या त्यागाचे स्मरण करीत मेहता यांनी शहिदांच्या कुटुंबीयांना सुख व धैर्य मिळण्यासाठी प्रार्थना करण्याचे सर्वांना आवाहन केले.

त्याआधी जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमुख कर्नल सुभाष रोखले यांनी निवृत्त सैनिकांसाठी नव्याने सुरू झालेल्या विविध योजनांची माहिती दिली. निवृत्तीवेतनात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे (एमआयआरसी) कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप भाटी, एसीसी अँड एसचे उपकमांडंट ब्रिगेडिअर माळवे उपस्थित होते.

अडचणींची जागेवर सोडवणूक
लेफ्टनंट जनरल मेहता यांनी आपल्या भाषणानंतर सैनिकांत मिसळून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निवृत्त सैनिकांनी आपल्या अडचणी खुलेपणाने मांडल्या. त्यात प्रामुख्याने मधुमेह व रक्तदाबासारख्या आजारांसाठी औषधे तीन दिवसांसाठीच दिली जातात. साठा कमी असल्याचे कारण सांगितले जाते, अशी तक्रार एका जवानाने केल्यावर तातडीने मेहता यांनी महिन्याची औषधे देण्याचे आदेश दिले. निवृत्तीवेतनाबाबतच्या अडचणींचीही तातडीने सोडवणूक करण्यात आली.

सैनिकांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था
या संमेलनाच्या निमित्ताने मिलिटरी हॉस्पिटल, वोक्हार्ट फाउंडेशन, मिरज नेत्रालय यांच्यातर्फे सैनिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी उभारलेल्या तंबूत डोळे, घसा, दात आदींच्या तज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली होती.

वीरमाता व वीरपत्नींचा केला गौरव..
या संमेलनाच्या निमित्ताने वीरमाता व वीरपत्नींचा गौरव लेफ्टनंट जनरल मेहता यांच्या पत्नी तथा आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशनच्या (आवा) अध्यक्ष सीमा मेहता यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला.

नगरच्या आर्र्मड कोअर सेंटर अँड स्कूलमध्ये रविवारी आयोजित पाच जिल्ह्यांतील निवृत्त सैनिकांच्या संमेलनात बोलताना एसीसीएसचे कमांडंट लेफ्टनंट जनरल अशोककुमार मेहता.