आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fruites Garden Deprived From Subsidy In Shrigonda Taluka

फळबाग अनुदानापासून श्रीगोंदे तालुका वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - फळबागा वाचवण्यासाठी शेतकर्‍यांना राज्य सरकारने घोषित केलेले अनुदान श्रीगोंदे तालुक्यापुरते फुसका बार ठरले आहे. मे महिना निम्मा उलटला तरी शेतकर्‍यांना अनुदानाचा अजून पहिला हप्तादेखील मिळालेला नाही. फळबागांचे पुरते वाटोळे झाल्यावर अनुदान देणार का, असा सवाल तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. फळबागा वाचवण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे, बागेची छाटणी व दुरुस्ती याकरिता राज्य सरकारने हेक्टरी 30 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी या अनुदानाचे वाटप झाले आहे.


राज्य सरकारने दोन टप्प्यांत हे अनुदान देण्याचे जाहीर केले होते. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांमुळेच राज्यातील फळबागाईतदारांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, विखे यांच्या जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील शेतकरी मात्र, फळबाग अनुदानापासून वंचित आहेत.


श्रीगोंद्यातील सुमारे साडेबारा हजार शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात आठ कोटी रुपये फळबाग वाचवण्याकरिता देण्याची शिफारस तालुका कृषी विभागाने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे केली होती. या अनुदानासाठी फाईल तयार करणे, याद्या करणे, त्याची तपासणी आदी सरकारी दप्तर दिरंगाईत दोन महिने उलटले. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार आम्ही संबंधित बँकांकडे शेतकर्‍यांच्या नावे पैसे जमा करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून यादी दिली आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या स्थानिक शाखांत चौकशी केली असता त्यांनी आमच्या जिल्हा शाखेला याविषयी माहिती विचारा, असे उत्तर मिळाले.


ही तर शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा
आधी दुष्काळाने शेतकर्‍यांची दैना उडवली. अन् आता सरकारी यंत्रणा बळीराजाची मस्करी करीत आहे. देतो. देतो. म्हणून चल पुढच्या ओढय़ा या उक्तीप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदतीकरता छळ केला जात आहे. सरकारला जर मदत द्यायचीच नव्हती, तर मग त्यासाठी जाहिरात तरी का केली? ज्या सरकारीबाबूंमुळे ही मदत रखडली त्यांची चौकशी केली जावी, अन् जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. कृषिमंत्री राधाकृष्ण विखेंच्या जिल्ह्यात शेतकर्‍यांवर असा दुर्दैवी प्रसंग यावा, याचे आश्चर्य वाटते.’’ अनिल घनवट, शेतकरी संघटना.


बँकांकडे शेतकर्‍यांची यादी सोपवली
श्रीगोंदे तालुक्यातील सुमारे साडेबारा हजार फळबागाईतदार शेतकर्‍यांची सरकारी मदतीसंदर्भातील यादी कृषी विभागाने संबंधित बँकांकडे दहा दिवसांपूर्वीच सोपवली आहे. बहुतेक शेतकर्‍यांचे बँकांतील खाते जिल्हा बँकेत असल्याने संबंधित रक्कम ऑनलाईन जमा करण्यात अडचण येत असावी. श्रीगोंदे तालुक्यातील बँका ऑफ इंडियाच्या खातेदारांच्या नावे पैसे जमा झाल्याची माझी माहिती आहे. अन्य राष्ट्रीयीकृत बँकांतदेखील त्वरित पैसे जमा होणे अपेक्षित आहे.’’ विश्वनाथ दारकुंडे, तालुका कृषी अधिकारी.