आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gade Accuede On Mla Rathod, Not Doing Work , Diyva Marathi

आमदार राठोडांच्या कार्यक्षमतेवर गाडे यांच्याकडून प्रश्नचिन्ह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवत शहराचे प्रतिनिधीत्व करणा-या शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांच्या कार्यक्षमतेवर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्याकडून सोशल मीडियाद्वारे प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे. गाडे व राठोड यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून सख्य नाही. विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर आल्या असताना त्यांच्यातील कलगीतुरा जाहीरपणे चव्हाट्यावर येत आहे. गाडे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर गाडे व राठोड यांचे फोटो टाकून यातून आगामी आमदार निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातून नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची गाडे यांची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. सलग पाच वेळा निवडून आलेल्या आमदार राठोड यांना सहाव्या वेळी पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी डावलण्याची शक्यता नसल्यात जमा असल्याचे जाणकारांचे मत आहे.
सोशल मीडियातील फेसबुक व व्हॉटस् अ‍ॅपवर गाडे यांच्या समर्थकांकडून गेल्या पंधरा दिवसांपासून आक्रमक लॉबिंग सुरू आहे. गाडे यांच्या समर्थकांकडून सुरू असलेले हे लॉबिंग त्यांचे नाव विधानसभेसाठी चर्चेत आणण्याचा प्रयत्न असू शकतो. मात्र, थेट गाडे यांच्या स्वत:च्या फेसबुक पेजवर आमदार राठोड यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या पोस्टस् टाकण्यात आल्या आहेत. शहर अविकसित राहण्यात आमदार राठोड यांची अकार्यक्षमता जबाबदार असल्याचा मतितार्थ या पोस्टस्मधून जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर प्रतिनिधी पाठवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीपासून गाडे व राठोड यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. शिवसेनेकडून गाडे यांची उमेदवारी अंतिम झालेली असताना राठोड यांच्यामुळे ऐनवेळी राजेंद्र पिपाडा यांना उमेदवारी मिळाल्याचा आक्षेप गाडे समर्थकांकडून घेतला जातो. या निवडणुकीत अरुण जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. त्यानंतरच्या काळात गाडे व राठोड यांच्यातील दुरावा वाढतच गेला आहे. हा दुरावा कमी करण्याचे प्रयत्नही पक्षश्रेष्ठींकडून झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील दरी रुंदावत गेली.
शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनामधूनही त्यांच्यातील दरी नगरकरांना दिसली. उड्डाणपूल, वीज आदी प्रश्नांवर राठोड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांकडे गाडे व त्यांचे समर्थक फिरकले नाहीत, तर जिल्हा शिवसेनेच्या आंदोलनाकडे आमदार राठोड व त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरवली. शह-काटशह देण्याचे प्रयत्न त्यांच्यात सातत्याने सुरू आहेत. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर शहराच्या उमेदवारीच्या मुद्याला तोंड फोडण्यात गाडे व त्यांचे समर्थक यशस्वी ठरत आहेत. व्हॉटस् अ‍ॅपवरून राठोड यांची बदनामी केल्याचा गुन्हाही कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची मते आजमावण्याचा प्रयत्न गाडे व त्यांच्या समर्थकांकडून सध्या सुरू आहे. मात्र, स्वपक्षातीलच आमदार अकार्यक्षम असल्याचा संदेश जाऊन पक्षहिताला बाधा पोहोचत असल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

‘त्यांनी’ शहरासाठी काय केले?
आम्ही उपजतच शिवसैनिक आहोत, त्यांच्यासारखे इतर पक्षातून आलो नाही. त्यामुळे पक्षनिष्ठा काय असते त्यांना माहीत नाही. ते सध्या काहीही बरळत आहेत, ही त्यांच्यासाठी शरमेची बाब आहे. आम्ही शहराचा विकास केला नसता, तर त्यांचे शहरात दोन-दोन हॉटेल उभे राहिले नसते. त्यांनी उत्तरेत शिवसेना खिळखिळी केली. एमआयडीसीतील वीजप्रश्नाबाबत त्यांनी एखादे आंदोलन केले का? त्यांनी उगाच निरर्थक बडबड करण्यापेक्षा स्वत:च्या लायकीप्रमाणे बोलले पाहिजे.’’ अनिल राठोड, आमदार.

पक्षादेश मिळाल्यास लढणार
नगर शहर किंवा श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. पक्षाने आदेश दिल्यास यापैकी कोणत्याही एका जागेवर निवडणूक लढण्याची तयारी आहे. शेवटी लोकशाहीत मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे मी माझी इच्छा श्रेष्ठींकडे मांडली आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेऊ. बंडखोरी करण्याचा विषयच येत नाही. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडू.’’
प्रा. शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.