आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडगीचा नाला फुटल्याने भातशेतीचे मोठे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले- गेल्यातीन-चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने अकोले तालुक्यातील अतिदुर्गम बिताका परिसरातील पाचगाववाडी येथील गाडगीचा नाला पहाटे फुटल्याने भातशेती वाहून गेली. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भातखाचरे वाहून गेली असून रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. येथील घरात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. आदिवासी पाचगाववाडीची लोकसंख्या ७० ते ८० आहे.
गुरुवारी पहाटे वनक्षेत्रात तयार केलेला चर सदोष झाल्याने फुटला. त्यामुळे चराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भातशेतीच्या नुकसानीस कारणीभूत ठरले. वनखात्याच्या क्षेत्रात कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी अडवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चराला भगदाड पडले. गाडगीचा नाला फुटल्याने पाचगाववाडी येथील आदिवासी शेतकरी तुकाराम धोंडू भांगरे, निवृत्ती धोंडू भांगरे या भावांची, तसेच वाळू सोमा भांगरे यांची भातशेती वाहून गेली. भातशेतीचे बांध फुटले. नाला फुटल्याने शेतात मोठ्या प्रमाणात दगड, माती वाहून आली. शेतातील दहा पायली भात बियाणांची रोपेही वाहून गेले असल्याची माहिती शिवसेनेचे कार्यकर्ते डॉ. शरद तळपाडे यांनी दिली.

डॉ. तळपाडे यांनी सकाळीच घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.