आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल-ताशांच्या गजरात ‘श्रीं ’चे आगमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या महिनाभरापासून लाडक्या गणरायांच्या आगमनाची प्रतीक्षा करणार्‍या नगरकरांनी सोमवारी मोठय़ा जल्लोषात व मंगलमय वातावरणात त्यांचे स्वागत केले. गणरायांबरोबर पावसाचे देखील पुनरागमन झाल्याने गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला. सनई-चौघडे व ढोल-ताशांच्या निनादात शहरात विविध ठिकाणी मोठय़ा उत्साहात श्रीगणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

‘मोरया मोरया..मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषामुळे अवघे शहर सोमवारी दिवसभर मंगलमय झाले होते. बालगोपाळांपासून, तर थोरांपर्यंत सर्वच गणरायाच्या स्वागताच्या तयारीत मग्न होते. अनेकांनी एक दिवस आधीच स्वागताची सर्व तयारी करून ठेवली होती. तरीदेखील हजारो गणेशभक्त सोमवारी सकाळी भरपावसात खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. त्यामुळे दिल्लीगेट, गांधी मैदान, कापडबाजार, प्रोफेसर कॉलनी चौक आदी ठिकाणांना जत्रेचे स्वरूप आले होते. शहराच्या विविध भागांत गणेशमूर्ती तसेच सजावट व पूजेच्या साहित्याचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. काहींनी आपल्या खासगी वाहनातून, तर काहींनी रिक्षा, टेम्पो या वाहनांमधून शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढून गणरायाला आपल्या घरी नेले. काही गणेश मंडळांनी सकाळीच मिरवणूक काढून गणरायांची प्रतिष्ठापना केली, तर अनेक मोठय़ा मंडळांची मिरवणुकीची तयारी दिवसभर सुरू होती.

शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा परिसरातील विशाल गणपती मंदिरात जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते सकाळी विधिवतपणे श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी माळीवाडा देवस्थान संस्थानचे अध्यक्ष अँड. अभय आगरकर, र्मचंट बँकेचे अध्यक्ष मोहन बरमेचा, विश्वनाथ राऊत, पंडित विजयशंकर मिर्शा, सुभाष राऊत, नगरसेवक संजय चोपडा, अशोक कानडे यांच्यासह गणेशभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दुपारी 4 पासून मोठय़ा मंडळांनी गणरायांची वाजत-गाजत मिरवणूक काढली. नगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशन गणेश मंडळाने नवीपेठ, तेलीखुंट, कापडबाजार आदी भागांतून मिरवणूक काढून गणरायांची प्रतिष्ठापना केली. पटवर्धन चौकातील शिववरद प्रतिष्ठानने डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत नगरी ढोल पथकाच्या माध्यमातून पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढली. वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. सार्वजनिक गणेश मंडळांनी रस्त्याच्या कडेला रंगीत पताका, रेशमी, मुलायम व कलाकुसरीच्या कापडाने मनमोहक कमानी उभारल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर ‘उत्सवमय’ झाले आहे. वाढती महागाई, रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि नित्याची वाहतूक कोंडी या सार्‍या चिंता आता विघ्नहर्त्यावर सोडून देत पुढचे दहा दिवस त्याच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी नगरकर सज्ज झाले आहेत.