आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवातील जुगार पोलिसांच्या रडारवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गणेशोत्सवात खेळल्या जाणाऱ्या विवध प्रकारच्या जुगारांना यावेळी पोलिसांचे विशेष पथक चाप लावणार आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक व पोलिस निरीक्षकांचा समावेश असलेल्या विशेष पथकाने अलीकडेच जिल्ह्यातील विवध ठिकाणच्या आठ जुगार अड्ड्यांवर छापे टाकून कारवाईचा श्रीगणेशा केला आहे.

गणेशोत्सवात अनेक भागात तीन पत्ते (तिरट), रम्मी (डब्बा), कॅटी फिराव असे विवध प्रकारचे जुगार खेळले जातात. नवे पंटर कॅरम व बदाम सातमध्ये आपले नशीब अजमावतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा पडली आहे. गणेशोत्सवात मंडळांसाठी पैसे मिळावेत, म्हणून सुरू झालेली ही परंपरा जणू काही जुगाऱ्यांचा हक्कच बनला आहे. गणेशोत्सवात जुगारामध्ये काेट्यवधींची उलाढाल होते. जुगारापायी अनेकांना लाखो रुपयांचे कर्ज झाल्याचीही उदाहरणे आहेत.

जुगारामुळे आजवर अनेक कुटुंबे रस्त्यावर आलेली आहेत. असे असले तरी जुगाऱ्यांचा "जोश' अजिबात कमी झालेला नाही. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी जुगाराचे अड्डे चालवणारे शहरात हॉटेलच्या खोल्या बुक करतात. फ्लॅट, दुकानेही भाड्याने घेतली जातात, तर ग्रामीण भागात शेतात जुगाराचे अड्डे चालतात.

यंदा मात्र पोलिस अधीक्षक लखमी गौतम व अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आतापासूनच जुगाऱ्यांची माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी खबऱ्यांना सक्रिय करण्यात आले असून गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे चालवणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. कोणत्याही परिस्थितीत जुगाराचे अड्डे चालू देणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
कारवाई करणार
पोलिसांच्या विशेष पथकाने आतापर्यंत जिल्ह्यातील ८ जुगार अड्ड्यांवर छापे टाकले आहेत. एकूण १३ लाख २० हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एकूण १२७ जुगाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही जुगार अड्ड्यांसह अवैध धंद्यांवर कारवाई केली जाईल. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. लोकांनीही माहिती द्यावी.” शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक.