आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मोरया'च्या गजरात गणरायाचे आगमन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!’च्या गजरात शुक्रवारी घरोघरी व सार्वजनिक मंडळांत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ढोलताशांचा नाद आणि गुलालाची उधळण यामुळे संपूर्ण शहर गणरायाच्या रंगात रंगले आहे. वाढती महागाई, रस्त्यांवर पडलेले खड्डे व नित्याची वाहतूक कोंडी या साऱ्या चिंता आता विघ्नहर्त्यावर सोडून देत पुढचे दहा दिवस त्याच्या चरणी सेवा अर्पण करण्यात नगरकर मग्न झाले आहेत. गणेशाच्या स्वागताचा थाटमाट पाहता नगरकरांची बाप्पावर असलेली नितांत श्रद्धा व तोच विघ्नहर्ता असल्याचा विश्वास ठायी-ठायी जाणवत आहे.
शहरात सर्वत्र गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. सनई-चौघडे व ढोल-ताशांच्या निनादात उत्साहपूर्ण वातावरणात मांगल्याचे प्रतीक असलेल्या बुद्धिदेवता श्रीगणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना झाली.
शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाड्यातील विशाल गणपती मंदिरात जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्या हस्ते सपत्नीक श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त व महंत उपस्थित होते. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर गणरायाची सामुदायिक महाआरती व त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप झाले.

बाप्पाच्या आगमनासाठी आवश्यक असलेली तयारी गुरुवारीच पूर्ण झाली होती. शुक्रवारी सकाळी गणेशमूर्ती घरोघरी नेण्यासाठी लगबग सुरु होती. माळीवाडा परिसर, चितळे रस्ता, गांधी मैदान, प्रेमदान चौक, पाइपलाइन रस्ता, तसेच भिंगार, केडगाव परिसरात गणेशमूर्तीं, सजावटीचे सामान व पूजासाहित्याचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी काहींनी आपल्या खासगी वाहनातून, तर काहींनी रिक्षा, टेम्पोमधून वाजतगाजत गणरायाला आपल्या घरी नेले.
‘मोरया मोरया... मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरामुळे अवघे शहर दिवसभर मंगलमय झाले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग हे यंदाचे वैशिष्ट्य होते. काही गणेशभक्त पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली, तर काहींनी आॅडिओ कॅसेटचा आधार घेत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली. रस्त्याच्या दुतर्फा गणेश मंडळांनी मनमोहक कमानी उभारल्या आहेत. रंगीत पताका, रेशमी, मुलायम व कलाकुसरीच्या कापडाने या कमानी सजवल्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. सार्वजनिक संस्था, पतसंस्था, तसेच विविध दुकानांमध्येही श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पटवर्धन चौकातील शिववरद प्रतिष्ठानने डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत नगरी ढोल पथकाच्या माध्यमातून पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढली. गणरायाच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या उकडीच्या मोदकांबरोबर चॉकलेटचे मोदक, आंबा मोदक व खिरापतीला, तसेच हार व फुलांनाही यंदा चांगली मागणी आहे. जास्वंदीचे फूल, पगडी, विड्याचे पान, जानवे, मोदक, २१ दुर्वांचा हार बाजारपेठेत दाखल झाले आहेत. शहरातील विविध कॉलन्या, हौसिंग सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विक्रांतची पालखी मिरवणूक
चौपाटी कारंजा परिसरातील विक्रांत गणेश मंडळाने पारंपरिक पध्दतीने पालखीतून मिरवणूक काढली. डाळमंडईतील श्रीराम मंदिरापासून निघालेली ही मिरवणूक चितळे रस्तामार्गे चौपाटी कारंजा येथे आली. भगवा झेंडा हाती घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या मुली मिरवणुकीचे आकर्षण ठरले. सजवलेल्या बैलगाड्या, बँडपथक आणि ढोल-ताशांचा गजर, त्याच्या तालावर दांडिया खेळणा-या मुली अशी ही मिरवणूक लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
भिंगारमध्येही उत्साह
भिंगार परिसरातही गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. प्रथेप्रमाणे ब्राह्मण गल्लीतील मानाच्या देशमुख गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मारुती मंदिरात गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मिठाईच्या दुकानांत मोदक व लाडू घेण्यासाठी गर्दी झाली होती. सार्वजनिक गणेश मंडळांची मोठी मिरवणूक दुपारी ४ वाजता सुरु झाली. लष्करी वसाहतीत दुपारी उत्सवाची लगबग सुरु होती. पावसात भिजत मिरवणुका सुरू होत्या.
नेता सुभाष मंडळातर्फे ‘सीसीटीव्ही’
उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून चितळे रस्त्यावरील नेता सुभाष मंडळाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. असे कॅमेरे बसवण्याचे या मंडळाचे सलग दुसरे वर्ष आहे. त्यामुळे उत्सव काळात होणाऱ्या चोऱ्या व छेडछाडीच्या प्रकारांना आळा बसणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक विक्रम राठोड यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गुरुवारी रात्रीपासूनच बंदोबस्त
शहरात सुमारे तीनशे पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्डही तैनात आहेत. आवश्यक ठिकाणी ‘फिक्स पॉइंट’ लावण्यात आले आहेत. गणेशमूर्ती विक्रीच्या ठिकाणी पोलिसांचे विशेष पथक गस्त घालत आहे. गुरुवारी रात्रीपासूनच हा बंदोबस्त तैनात आहे. कुठलाही अनुचित प्रकार आढळला, तर पोलिसांशी संपर्क साधावा.'' यादवराव पाटील, उपअधीक्षक, शहर विभाग
केडगावमध्ये उत्साहात प्रतिष्ठापना
पावसाच्या हलक्या सरी येत असल्या, तरी शुक्रवारी सकाळी केडगाव उपनगरात मोठ्या उत्साहात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या उपनगरात मोठ्या मंडळांचे प्रमाण कमी असले, तरी छोट्या मंडळांची संख्या लक्षणीय आहे. सायंकाळी उिशरापर्यंत विविध मंडळांच्या मिरवणुका वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात सुरु होत्या.