आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवामुळे बाजारपेठांमध्ये चैतन्य, सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत चैतन्य अवतरले आहे. सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानांत गर्दी वाढली आहे. शहराच्या विविध भागात पूजा साहित्य अन्य वस्तूंचे स्टॉल उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
गणेशोत्सव सप्टेंबरपासून सुरू होत आहे. शहराच्या विविध भागांत सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारण्याचे काम सुरू केले आहे. प्रोफेसर कॉलनी, सावेडी, नागापूर, भिंगार, केडगाव, माळीवाडा या भागात गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात येत आहेत. शहरात गणेशमूर्ती तयार करणारे अनेक कारखाने असून, तेथून राज्याच्या विविध भागात गणेशमूर्ती जात असतात. काही ठिकाणी मूर्तींवर शेवटच्या हात फिरवण्याची लगबग सुरू आहे.
मोठ्या आकारातील मूर्ती यंदा हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, हत्तीवरील गणपती यासह दूरचित्रवाणी मालिकेमधील जय मल्हार आदी मूर्तींना चांगली मागणी आहे. गणेशोत्सवासाठी लागणारे सजावटीचे साहित्य बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. थर्माकॉलचे मकर, कमानी यांना मोठी मागणी आहे. थर्माकॉलचा वापर करून तयार केलेली छोटी मंदिरे १५० पासून ४५० रुपयांपर्यंत मिळतात. आकर्षक रंगसंगती असलेल्या दिव्यांच्या माळाही बाजारात मिळतात. सध्या चायना माळा मोठ्या प्रमाणात आल्या असून, २५ रुपयांपासून १५० रुपये किमतीपर्यंतच्या या माळा आहेत. गणपतीसमोर ठेवण्यासाठी लागणारे साहित्य विविध प्रकारांत उपलब्ध आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून यंदा चायना मेड उत्पादने वापरण्याचे आवाहन केले जात आहे. चायना वस्तूंऐवजी स्वदेशी बनावटीच्या वस्तू वापरल्यास आपला पैसा परदेशात जाणार नाही, असे या आवाहनात नमूद करण्यात येत आहे. त्याचा काहीसा परिणाम होऊन चिनी मालाची मागणी कमी झालेली दिसते.
सावेडीतील एस. मुदगंटी यांनी बनवलेल्या उंदरांच्या मूर्ती ग्राहकांचे आकर्षण ठरल्या आहेत.
तुळजाई फ्लोरिस्ट यांनी कृत्रिम फुलांपासून गणपतीसाठी आसन बनवले आहेत.
घुमरेगल्ली येथील तांबाेळी यांच्याकडील मुलतानी मातीचे गणपती.

पर्यावरणपूरक मखर
^यंदा ५००रुपयांपासून हजार रुपये किमतीपर्यंतचे मखर उपलब्ध आहेत. कमान, झोपाळा, मोदक डमरू यांनाही चांगली मागणी आहे. पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या हेतूने प्रथमच मखर तयार करताना कापडाचा वापर करण्यात आला आहे. कापडी फुले लाकडाचा वापर करून हे मखर तयार करण्यात आले आहे. कुठेही प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला नाही.'' सागरगारूडकर, विक्रेते.

चायना माळांना यंदा मागणी घटली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे यंदा काही प्रमाणात चायना साहित्याची मागणी घटली आहे. चायना माळांच्या तुलनेत एलईडी दिवे स्वस्तात मिळत असल्याने ग्राहक देशी साहित्याकडे वळाल्याचे दिसत आहे. चायना उत्पादने वापरू नयेत, यासाठी सध्या सोशल मीडियातून आवाहन केले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...