आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांचे उत्साहात आगमन, पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ‘गणपत्ती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सोमवारी घरोघरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळांसह नगरकरांनी बाप्पांचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. शहर उपनगरांतील सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत गणरायांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. त्यामुळे अाबालवृध्दांचा उत्साह द्विगुणीत झाला. पुढील नऊ दिवस अवघे नगर गणेशमय होणार आहे.
शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या हस्ते सपत्नीक गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी माळीवाडा देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह विश्वस्त महंत उपस्थित होते. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर गणरायाची सामुदायिक महा आरती त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले.

बाप्पांच्या स्वागताचा थाटमाट पाहता नगरकरांची बाप्पावर असलेली नितांत श्रद्धा, तसेच तोच खरा विघ्नहर्ता असल्याचा विश्वास सोमवारी ठायी-ठायी जाणवत होता. शहरात उपनगरांत ठिकठिकाणी गणरायांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. सनई-चौघड्यांचा ढोल-ताशांच्या निनादात उत्साहपूर्ण वातावरणात मांगल्याचे प्रतीक असलेल्या बुद्धिदेवता श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजत-गाजत मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना केली.

बाप्पाच्या आगमनासाठी आवश्यक ती तयारी नगरकरांची रविवारीच पूर्ण केली होती. सकाळपासूनच घरोघरी गणेशमूर्ती नेण्याची लगबग सुरु होती. माळीवाडा परिसर, चितळे रोड, गांधी मैदान, प्रोफेसर कॉलनी चौक, पाइपलाइन रस्ता, तसेच भिंगार, केडगाव आदी भागात गणेशमूर्ती सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. ‘मोरया मोरया...मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषामुळे अवघे नगर शहर सोमवारी दिवसभर मंगलमय झाले होते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढली, हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.

भिंगारमध्येही उत्साह
भिंगारपरिसरातही गणरायांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. प्रथेप्रमाणे ब्राह्मण गल्लीतील मानाच्या देशमुख गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मारुती मंदिर परिसरात गणेशमूर्ती पूजेचे साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. येथील सार्वजनिक गणेश मंडळांची मोठी मिरवणूक दुपारनंतर सुरु झाली. लष्करी वसाहतीतदेखील सकाळपासूनच गणेशोत्सवाची लगबग सुरु होती. केडगावमध्येही उत्साहात गणरायाचे आगमन झाले. पावसाने ‌विश्रांती घेतल्याने कोणताही व्यत्यय येता मिरवणुका शांततेत पार पडल्या.
चौकाचौकांत पोलिस बंदोबस्त तैनात
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात, तसेच जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीच्या वेळी चौकाचौकांत पोलिसांची गस्त सुरू होती. डीजेसह इतर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस डोळ्यात तेल घालून उभे होते. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत मंगलमय वातावरणात सर्वांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली. सुदैवाने या काळात पाऊस आला नाही.

मुली महिलांचा मोठा सहभाग
यंदा शहर उपनगरांतील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी पारंपरिक पध्दतीने मिरवणुका काढल्या. त्यात मुली महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. लेझीम ढोल पथकांमध्येही महिलांचा सहभाग होता. नगर अर्बन बँक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत पारंपरिक राजस्थानी पेहेरावातील महिलांचे ढोल पथक सर्वांचे आकर्षण ठरले. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

‘शिववरद’ने जिंकली मने
पटवर्धन चौकातील शिव वरद प्रतिष्ठानच्या वतीने पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील पोतराज, वाघे-मुरळी, वारकरी धनगर नृत्याने नगरकरांची मने जिंकली. ढोल पथकही सर्वांचे आकर्षण ठरले. प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर डागवाले यांनी स्वत: पखवाज वाजवत या मिरवणुकीत उत्साह आणला.

अर्बन बँक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पालखीतून श्रींची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेचे संचालक सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...