आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांच्या निरोपासाठी जय्यत तयारी, पोलिस प्रशासनातर्फे मंडळांना बक्षिसे जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - फुलांनी सजवलेल्या सिंहासनावर तर काही ठिकाणी चांदीच्या पालखीत विराजमान बाप्पा... ढोल-ताशांचा दणदणाट... सनईचे मंगलमय सूर... रांगोळ्यांच्या पायघड्या... वेगवेगळ्या लेझीम क्रीडा प्रकारांचे सादरीकरण...अशा पारंपरिक मंगलमय वातावरणात शहरातील प्रमुख मंडळांच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक रविवारी (२७ सप्टेंबरला) निघणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी पर्यंंत मानाच्या गणेश मंडळांच्या मिरवणुका निघणार आहेत. त्या जल्लोषमय, मंगलमय वातावरणात पार पडण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. या मिरवणुकीत काेणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून जिल्हा पोलिस प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.
शांततापूर्ण शिस्तबद्ध मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना विशेष बक्षिसे देऊन गौरवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने यंदा घेतला आहे. दरवर्षी डीजेला फाटा देण्याचे आवाहन केले जाते. मात्र, तरुणाईच्या हट्टापायी काही मंडळे डीजे लावतातच. गेल्या काही वर्षांपासून मात्र ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिल्यामुळे पोलिस प्रशासनही कडक झाले आहे. म्हणूनच यंदा गणेशाचे स्वागताला डीजे वाजले नाहीत. शिवाय भिंगारच्या विसर्जन मिरवणुकीतही सर्वच मंडळांनी डीजेमुक्त मिरवणूक काढून नवा आदर्श घालून दिला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीमध्ये बारा मंडळे सहभागी झाली. मात्र, सर्व मंडळांनी पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या तालावर गणरायांना निरोप दिला.

शहरातील गणेशाची मुख्य विसर्जन मिरवणूक ही रामचंद्र खुंट, आडते बाजार, दाळ मंडई, तेलीखुंट, कापडबाजार, अर्बन बँक चौक, नवी पेठ, खामकर चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट या मार्गे येऊन अमरधामजवळील बाळाजी बुवा या विहिरीत श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील जमाव हा गणेश विसर्जन करून पुन्हा जोडरस्त्याने येऊन मुख्य मिरवणुकीत सामील होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्याला मिळणारे रस्ते, उपरस्ते, गल्लीबोळा, जोडरस्ते यावर दोन्ही बाजूला शंभर मीटर अंतरापर्यंत वापर करण्यास मनाई करण्यासाठी सीआरपीसी कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

मिरवणुकीची डावी बाजू : पाचलिंबगल्लीकडे जाणारा रस्ता, सारडा गल्लीकडे जाणारा रस्ता, मोची गल्लीकडे जाणारा रस्ता, जुना कापड बाजाराकडे जाणारा रस्ता, माणिक चौकाकडे जाणारा रस्ता, अर्बन बँक ते माणिक चौकाकडे जाणारा रस्ता, नवीपेठ ते आझाद चौकाकडे जाणारा रस्ता, सुवालाल गुंदेचा यांच्या घरापासून गांधी मैदानाकडे जाणारा रस्ता, नवी पेठेतून खजूर गल्लीकडे जाणारा रस्ता, खजूर गल्लीकडे जाणारी बोळ (चितळे रोड), नगर वाचनालय, खजूर गल्लीकडे जाणारा रस्ता, चितळे रोड पोलिस चौकी, मिरावली दर्गा, लक्ष्मी कारंजाकडे जाणारा रस्ता, चितळे रोड, रंगार गल्लीकडे जाणारा रस्ता, चौपाटी कारंजा, कोर्टाकडे जाणारा रस्ता नालेगावकडे जाणारा रस्ता.

मिरवणुकीचीउजवी बाजू : बागडपट्टीकडेजाणारा रस्ता, हॉटेल जगदीश भुवन, कुंभार गल्लीकडे जाणारा रस्ता, मुंजाबा चौक, ठाकूर गल्ली, शिवालयाकडे जाणारा रस्ता, छाया टॉकीज, तोफखानाकडे जाणारा रस्ता, हॉटेल पिंगारा, कागदपुठ्ठा मशीद, भराडगल्लीकडे जाणारा रस्ता, नेहरू मार्केट भराड गल्लीकडे जाणारा रस्ता, चितळे रोड, सातभाई गल्लीकडे जाणारा रस्ता, चौपाटी कारंजा, नालेगावकडे जाणारा रस्ता. या रस्त्यांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. फौजदारी दंड संहिता प्रक्रियेअंतर्गत नगरच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश लागू केले आहेत.

चाेख बंदोबस्त
पोलिसअधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, १० पोलिस निरीक्षक, ३७ सहायक पोलिस उपनिरीक्षक, ५०० पोलिस कर्मचारी, ९० महिला पोलिस, आरसी प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, ९० पुरुष, २५ महिला होमगार्ड.

पोलिसांतर्फे खास गौरवचिन्हे
जिल्हा पोलिस दलातर्फे विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या शिस्तबद्ध मिरवणूक मंडळांना प्रत्येकी तीन गौरवचिन्ह दिले जाणार आहेत. पारंपरिक वाद्य तसेच ढोल पथकांनाही प्रत्येकी तीन गौरवचिन्ह देण्यात येणार आहेत. तसेच सर्व गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांसह उत्कृष्ट मिरवणूक काढून गणेश उत्सव मिरवणुकीची शोभा वाढवावी, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

सीमेवर असेल नाकेबंदी
यंदा मिरवणुकीवर आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी साध्या वेशातील पथके नेमलेली आहेत. शिवाय कॅमेरे आणि दुर्बिणीतूनही वॉच ठेवला जाणार आहे. शहराच्या सीमेवर नाकेबंदी करण्यात येणार असून वाहनांची कडक तपासणी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार आहे. संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास नागरिकांनी थेट पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी केले आहे. खासगी वेशातील पोलिसही समाज कंटकांना रोखण्यासाठी सज्ज असणार आहेत.

शहरात टेहळणी
आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडाव्यात म्हणून हिप्पो क्रेन, छोट्या पोलिस क्रेन, खासगी आणि महापालिकेच्या क्रेन ठेवण्यात येणार आहेत. गणपती विसर्जनाच्या मिरवणुका वाहतूक यावर टेहळणी करण्यासाठी मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी मनोरे उभारण्यात आले आहेत. तसेच मुख्य मिरवणुकीवर खास लक्ष ठेवण्यासाठी ठरावीक इमारतींची छतेही प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. तेथून पोलिस प्रशासन दुर्बिणीद्वारे मिरवणुकीतील प्रत्येक हालीचालीवर लक्ष ठेवणार आहे. मिरवणुकीचे छायाचित्रणही केले जाणार आहे. चितळे रोड, कापड बाजार, नवी पेठेतील शांतता समितीच्या स्टॉलवर लहान मुलांचे शोध केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्रही असतील.

सावेडीमध्ये दुपारी १२ वाजता मिरवणुकीला सुरुवात
सावेडीतील लक्ष्मी आईच्या मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात होते. दुपारी बारा वाजता मिरवणूक सुरू होईल. ढोल-ताशे हे या मिरवणुकीचे खास आकर्षण असेेल. याशिवाय गल्लीबोळातील, सोसायट्यांमधील बाप्पाच्या मिरवणुकाही निघणार आहेत. काही सोसायट्यांमधील बाप्पांचे विसर्जन मुळा धरणावर केले जाते. त्यामुळे दिवसभर धांदल असणार आहे. दहा दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याला निरोप देताना सर्वजण भावुक होतात. मात्र, पुढच्या वर्षी लवकर या, असे अावाहन करीत बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. शाळा-महाविद्यांलयांमध्ये प्रतिष्ठापना झालेल्या बाप्पांचेही सकाळी किंवा दुपारपर्यंत विसर्जन केले जाईल.

कृत्रिम हौदात करा विसर्जन
या वर्षी आपण आपला घरगुती गणपती महापालिका, नगरपालिका, नगर परिषद यांनी उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौदात विसर्जित करावा, असे आवाहन बार्टीचे सहायक प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अगदी गावापासून ते शहरापर्यंत पाणी टंचाई वाढत आहे. पाण्याचा साठा आणि वर्षभर असणारी मागणी यात अंतर आहे. कोणत्याही वाहत्या किंवा सहज उपलब्ध असलेल्या पाण्याच्या स्रोतात गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलप्रदूषण होते. पण, कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यास पाण्याचे साठे प्रदूषित होण्यापासून वाचवू शकतात. मूर्तीसोबत असणारे निर्माल्य पाण्यात विसर्जित करता कलशात टाकावे. जेणे करून त्याचे पावित्र्य राखले जाईल. पुण्यातील सर्व मानाच्या गणपती मंडळांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा निर्णय घेतला असून आपल्या गणेश मूर्तीचे ते कृत्रिम हौदात विसर्जन करणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी याचा आदर्श घेत पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करावे. तसेच नागरिकांनीही याबाबत सजग होऊन कृत्रिम हौदात आपली गणेश मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आले आहे.