आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती कारखान्यांत दोन हजारांना रोजगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गणेशमूर्ती तयार करणार्‍या कारखान्यांसाठी नगर प्रसिद्ध आहे. या कारखान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. वर्षभर मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असल्याने सुमारे दोन हजार कारागिरांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध झाला आहे. नगरच्या गणेशमूर्ती आकर्षक, रेखीव व तुलनेने स्वस्त असल्याने देशभरातून त्यांना वाढती मागणी आहे.

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवास लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. या उत्सवाचे स्वरूप उत्तरोत्तर अधिक व्यापक झाले. त्यामुळे मूर्तींची मागणी वाढते आहे. या व्यवसायात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. कारखान्यांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे. यंदा 9 सप्टेंबरला गणेशाचे आगमन होत आहे. उत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे कारखान्यात तयार झालेल्या मूर्तींच्या रंगरंगोटीच्या कामाला वेग आला आहे.

नगर शहरात सुमारे 150 गणेश कारखाने आहेत. एका कारखान्यात चार ते पाच हजार मूर्ती तयार होतात.

प्रत्येक कारखान्यात 25 ते 30 कारागीर वर्षभर काम करत असतात. नगरच्या मूर्ती आकर्षक असल्याने मुंबई, पुणे, नाशिक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी ठिकाणच्या बाजारपेठेत त्यांना मागणी असते. 95 टक्के मूर्ती परगावी जातात. कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे कारागिरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता महिलादेखील या कारखान्यांत काम करू लागल्या आहेत. सुमारे 100 महिला या व्यवसायात आहेत. काही मंडळे एकच मूर्ती अनेक वर्षे स्थापन करतात. त्यामुळे मोठय़ा मूर्तींना गणेश मंडळांकडून प्रतिसाद कमी प्रमाणात मिळतो.

20 टक्क्यांनी भाववाढ
मूर्तीसाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस राजस्थानमधील मोरवी येथून आणली जाते. मागील वर्षीच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिसचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील वर्षी 120 रुपयांना मिळणारी 22 किलोची पिशवी आता 140 ते 150 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. काथ्याच्या 30 किलोच्या गुंडीसाठी 1200 रुपये मोजावे लागत आहेत. परिणामी मूर्तीचे भाव 20 टक्क्यांनी वाढले आहेत.

फायदा गणेशभक्तांचा
शहरातील कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे स्पर्धेमुळे कमी दरात मूर्ती विकावी लागते. कालबाह्य झालेले जुने साचे ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक घेऊन जातात. त्यामुळे तेथील दर कमी असतात. यात गणेशभक्तांचा फायदा होतो. व्यावसायिकांना मात्र जेमतेम नफा मिळतो.’’ अशोक देशमुख, कारखानदार