आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाने दिला सात हजार कामगारांना रोजगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आठवड्यावर गणेशोत्सव आल्याने सध्या शहरात गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेशमूर्ती तयार करणारे 120 कारखाने शहरात आहेत. या कारखान्यांत सुमारे 7 हजार कारागिरांना रोजगार मिळाला आहे. मूर्तीविक्रीतून यंदा सुमारे 5 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.

9 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. शहरातील विविध गणेश मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. कापडबाजार, चौपाटी कारंजा, सावेडी, पाइपलाइन रोड, केडगाव, भिंगार, नागापूर या भागात गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत.

गणेशमूर्ती तयार करण्याचे राज्यात सर्वाधिक 120 कारखाने नगर शहरात आहेत. या कारखान्यांत तयार होणार्‍या मूर्ती गुजरात, हैदराबाद, बंगलोर, देहराडून यांसह मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण, ठाणे, नांदेड व औरंगाबाद या भागात विक्रीसाठी जातात. या कारखान्यांमध्ये 7 हजार कामगारांना रोजगार मिळाला आहे. गणेशमूर्ती विक्रीतून दरवर्षी सुमारे 3 ते 4 कोटींची उलाढाल होते. यंदा सुमारे 5 कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा कारखानदारांनी व्यक्त केली.

या कारखान्यांमध्ये 5 इंचांपासून 12 फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. त्यांच्या किमती 70 रुपयांपासून ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहेत. शाडूचे दीड हजारांपर्यंत किमतीचे गणपतीही यंदा विक्रीसाठी आले आहेत. धनलक्ष्मी, प्रभावळ, सिंहासन, हनुमान आरूड, शंकर अवतार, टिटवाळा बैठक, उंदरावर आरूड गणपती, साईबाबा अवतार, हत्तीवर आरूढ गणपती, शेषनाग गणपती, कमळ गणपती, सिध्दिविनायक गणपती, लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, लोकमान्य टिळकांच्या वेषभूषेतील गणपती, चिंचपोकळी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभूषेतील मूर्तींनाही मोठी मागणी आहे.

शाडूच्या मूर्तीना मागणी
मध्यमवर्गीय ग्राहकांचा शाडूचे गणपती घेण्याकडे कल आहे. शहरात शाडूचे गणपती तयार करणारे तीन कारखाने आहे. शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती 200 पासून 1200 रूपयांपर्यंत उपलब्ध बाजारात उपलब्ध आहेत.’’ सिध्देश्वर बोरूडे, मूर्तिकार

मूर्ती 30 टक्के महागल्या
वाढत्या महागाईचा फटका गणेशमूर्तींनाही बसला आहे. यंदा 30 टक्क्यांनी मूर्ती महागल्या आहेत. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे रंग, चमकी, तसेच अन्य कच्च्या मालांच्या किमतीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.’’ बबन गोसके, मूर्तिकार.