आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Shinde Speak With Divya Marathi Team, At Nagar

आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक, वन्स मोअर नसतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आयुष्याच्या चित्रपटाला पुन्हा रिटेक अन् आयुष्याच्या गाण्याला पुन्हा वन्स मोअर नाही. म्हणून आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा, असा सल्ला पुणे येथील यशदा संस्थेचे व्याख्याते गणेश शिंदे यांनी दिला.
शिंदे हे व्याख्यानानिमित्त नगरमध्ये आले असता त्यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी विविध विषयांना हात घालत जीवनातील छोट्या-मोठ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा केली. शिंदे म्हणाले, भगवान महावीर, तुकोबा, ज्ञानोबा, शिवाजी महाराज आणि मॅनेजमेंट, शिक्षण व्यवस्था, करिअर, जगण्यात मौज आहे, शिक्षण व्यवस्था, व्यक्तिमत्त्व विकास, युवा शक्ती या विषयांवर मी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगली येथे व्याख्यान देण्याची मिळालेली संधी ही माझ्यासाठी सर्वात मोठी संधी होती. या व्याख्यानमालेत यापूर्वी पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे यांच्यासारख्या दिग्गजांची व्याख्याने झाली आहेत. त्या व्यासपीठावर वयाच्या 27 व्या वर्षी संधी मिळावी हे माझे भाग्य समजतो. प्रबोधनातून समाज सुधारतो, अशी माझी भावना आहे. चांगले विचार समाजावर बिंबवल्यास निश्चितच समाजाची प्रगती होईल. मी कुठलेही काम पैशासाठी करत नाही. मला व्याख्याने देणे आवडते म्हणून मी व्याख्याने देण्याचे काम करतो. व्याख्यानांमधून केलेल्या समाजप्रबोधनातून समाजात निश्चितच सुधारणा होईल, असा माझा विश्वास आहे. मला माझे काम कधीच कंटाळवाणे वाटले नाही. आई-वडील मला नेहमी भेट म्हणून पुस्तके देत असत. त्याच पुस्तकांतून मी घडत गेलो. जगात सर्वांना वेळ आहे, पण तो वेळ आपण कुठे व कसा द्यायचा हे ठरवावे. गुदमरून जगल्यासारखे आयुष्य जगू नका. कारण आयुष्याच्या चित्रपटाला पुन्हा रिटेक आणि गाण्याला पुन्हा वन्स मोअर कधीही मिळत नसतो...

शासकीय नोकरी सोडली, व्याख्याने सुरू केली...
मूळ गाव पारगाव भातोडी व सध्या केडगाव येथे राहणारे गणेश शिंदे यांनी वयाच्या 15 व्या वर्षी टाकळी ढोकेश्वर येथे ‘शिवाजी महाराज’ या विषयावर पहिले व्याख्यान तासभर दिले. तेव्हापासून ते व्याख्यान देण्यात रमत गेले. पुढे एमबीए झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेत तीन महिने शासकीय नोकरी केली. नोकरीत मन रमेना म्हणून तीन महिन्यांनंतर सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी व्याख्याने देण्याचे काम सुरू केले. आता त्यांचे वय 28 आहे. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यात 1 हजार व्याख्याने दिली आहेत. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी ‘सुख’ हे पुस्तक लिहिले आहे.

ज्ञानोबाचे संगीतमय चरित्र आता दुबईला
एप्रिल महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ज्ञानेश्वर महाराज यांच्या संगीतमय चरित्रावर दररोज तीन तास व्याख्याने दिली. पुण्यातील उच्च्शिक्षित मित्रांनी मिळून आम्ही हे व्याख्यान दिले. आता ज्ञानोबा माउलींचे संगीतमय चारित्र आखाती देशांपैकी एक असलेल्या दुबईला नेण्याचा विचार आहे. दुबईतील काही मराठी लोकांनी तशी तयारी केली आहे. त्याबाबत सध्या प्राथमिक चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत तारीख निश्चित होईल. महाराष्‍ट्रात सोलापूर, पुणे येथे असा कार्यक्रम झाला आहे. अन्य राज्यांतही असा कार्यक्रम करण्याचा मानस आहे. ’’
गणेश शिंदे, व्याख्याते.