नगर- स्वत: बनवलेली शाडूची गणेशमूर्ती, सौरउर्जेवर फिरणारे हरितचक्र आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश देणारी सुपरफास्ट ग्रीन गणेशा इंडिया एक्स्प्रेस, भारताचा पर्यावरणमापक, घोषवाक्याचे सूर्यफूल असा पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा देखावा कृतीशिल शिक्षक अमोल बागूल यांनी साकारला.
विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या बागूल यांनी कागद, पुठ्ठे, लाकूड, माती, रिकाम्या काड्यापेट्या, पेन्सिल, खोके आदी सहज विघटित होणाऱ्या साहित्यापासून गणेशोत्सवातील देखावा साकारला. आकाशकंदील, खेळणी व प्रतिकृती बनवून प्रदूषणमुक्त व निसर्गपूरक उत्सवाचे अनोखे उदाहरण त्यांनी घालून दिले.
बागूल यांची ग्रीन गणेशा एक्स्प्रेस आबालवृद्धांचे आकर्षण ठरली. कागदी सूर्यफुलाच्या पाकळ्यांवरील घोषवाक्ये वृक्षांचे महत्त्व सांगतात, तर भिंतीवरील घड्याळाच्या सेकंद, मिनिट व तासकाट्यांना अनुक्रमे वृक्षलागवड, विकासदर व लोकसंख्यावाढ ही नावे डकवून १ ते १२ या क्रमांकांना रोगराई, अंधश्रद्धा, प्रदूषण, स्त्री भ्रूणहत्या आदी सामाजिक समस्यांची नावे देऊन बागूल यांनी सादर केलेला भारताचा पर्यावरण नकाशा या देखाव्याचे आकर्षण ठरला. टाकाऊपासून टिकावू या संकल्पनेचा वापर करुन त्यांनी हा देखावा साकारला. देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना बागूल यांनी वृक्षांची रोपे, बिया व माझी पर्यावरण प्रतिज्ञा भेट दिली.