आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाच्या निरोपाची जय्यत तयारी, विसर्जन मिरवणुकीवर 100 सीसीटीव्‍ही कॅमे-यांची नजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पारंपरिक वातावरणात शहरातील प्रमुख मंडळांच्या गणरायांची विसर्जन मिरवणूक मंगळवारी निघणार आहे. सकाळी १० पासून सायंकाळपर्यंत मानाच्या गणेश मंडळांच्या मिरवणुका निघतील. काेणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकीवर सुमारे शंभर सीसीटीव्हींची करडी नजर असेल. शिस्तबद्ध मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना पोलिस प्रशासन विशेष बक्षिसे देऊन गौरवणार आहे. सावेडीत दुपारी बारा वाजता मिरवणूक सुरू होईल. 
 
माळीवाड्यातील विशाल गणेश मंदिरातील श्रींची उत्थान पूजा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी झाल्यानंतर १० वाजना मानाच्या गणपतींची मिरवणूक निघेल. शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक रामचंद्र खुंट, आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, कापडबाजार, अर्बन बँक चौक, नवीपेठ, खामकर चौक, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्ली दरवाजा यामार्गे जाऊन नेप्ती नाक्यावरील बाळाजी बुवा विहिरीत श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होईल. मुख्य विसर्जन मार्गाला मिळणारे रस्ते, उपरस्ते, गल्लीबोळा, जोडरस्ते यावर दोन्ही बाजूला १०० मीटर अंतरापर्यंत वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 
टेहळणी करण्यासाठी मुख्य विसर्जन मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी मनोरे उभारण्यात आले आहेत. मुख्य मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी काही इमारतींची छते प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. मिरवणुकीचे छायाचित्रण होणार आहे. चितळे रस्ता, कापड बाजार, नवी पेठेतील शांतता समितीच्या स्टॉलवर लहान मुलांचे शोध केंद्र कार्यान्वित केले आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्रही असेल. 
 
पोलिस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपअधीक्षक, १० निरीक्षक, ३७ सहायक उपनिरीक्षक, ५०० कर्मचारी, ९० महिला पोलिस, आरसी प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, ९० पुरुष, २५ महिला होमगार्ड. तीन छेडछाड विरोधी पथके तैनात असतील. मिरवणुकीत आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची साध्या वेशातील पथके असतील. कॅमेरे दुर्बिणीतून वॉच असेल. वाहनांची तपासणी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जाईल. संशयास्पद व्यक्ती, वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...