आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन हट्टी गणेश मंडळांचा ‘डीजे’मुक्तीत खोडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - न्यायालयाचा आदेश धुडकावून शिवसेना शहर समझोता मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवल्याने कोतवाली ठाण्यात चौघांविरुद्ध, तर तोफखाना ठाण्यात तिघांविरुद्ध ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले. 
 
कोतवाली पोलिसांनी शिवसेनेचा नगर शहर मित्रमंडळाचा अध्यक्ष मच्छिंद्र बाबुराव म्हस्के (जिल्हा वाचनालयासमोर, चितळे रस्ता), सीडीचालक सनी भाऊसाहेब पाळंदे (बोल्हेगाव), जनरेटर वाहनचालक पंडित किसन सोनवणे ( हिंगणगाव) ट्रॅक्टरचालक संजय रामराव वारुळे (वारुळवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. ट्रॅक्टर, टेम्पो, चार साऊंड, आठ बेस इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. 

तोफखाना पोलिसांनी समझोता मंडळाचा अध्यक्ष शिवाजी अशोक कदम, अमोल दिनकर आमले, भिंगार मुकेश विठ्ठल थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. ट्रॅक्टर, १७ स्पिकर, मिक्सर, अॅम्प्लिफायर, २५ लाईट बोर्ड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 
 
पोलिसांचे\"डीजेमुक्त\' मिरवणुकीचे आवाहन धुडकावून शिवसेनेच्या दोन हट्टी मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट केला. पावसाची रिपरिप, हृदयाचे ठोके वाढवणारे संगीत, कर्णकर्कश संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई, मद्यधुंद कार्यकर्ते, त्यामुळे रेंगाळलेली मिरवणूक, घोषणाबाजी अशा वातावरणात दोन मंडळांनी बाप्पाला निरोप दिला. उर्वरित मंडळांनी मात्र पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर गुरूवारी विसर्जन मिरवणूक काढली. 
सकाळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते शहराचे ग्रामदैवत श्रीविशाल गणेशाची उत्थापन पूजा करण्यात आली. नंतर विसर्जन मिरवणूक सुरू झाली. नगरच्या युवक-युवतींचे ढोल-ताशे पथक मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. हजारो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते. बंगाल चौकी, भिंगारवाला चौक, नगर अर्बन चौक, नवीपेठ येथे नागरिकांनी विशाल गणपतीच्या रथाचे स्वागत केले. मिरवणूक मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. मिरवणुकीत एकूण १२ मंडळे सहभागी झाली. श्रीविशाल गणेश मंडळ अग्रभागी त्यापाठोपाठ इतर मंडळे होती. 

डोक्यावर फेटे, नाकात नथ आणि हातात लेझीम घेतलेल्या स्त्रिया, ढोल-ताशांचे पथक, गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. असं म्हणत जड अंत:करणाने लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मानाच्या विशाल गणपतीने जागोजागी भक्तांकडून आरतीचा मान घेत आवडत्या मोदकाचा नैवेद्य स्वीकारत रथातून थाटात भक्तांचा निरोप घेतला. 

यावर्षी सगळीकडे पारंपरिक वाद्यांनी मिरवणुकीत स्थान मिळवले. सायंकाळी नंतर तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आबालवृद्धांनी सहकुटुंब मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत सहभागी झालेले नगरी ढोल, ताशा हलगी पथक हे मुख्य आकर्षण ठरले. दांडपट्टा तलवारबाजीचे प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. मिरवणूक दिल्ली दरवाजाजवळ आल्यानंतर भाविकांनी गुलालाची उधळण गणरायाचा जयघोष केला. घरगुती गणरायांचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने बाळाजी बुवा बारव येथे हौदाची व्यवस्था केली होती. 
आमदार संग्राम जगताप यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. छायाचित्रे : मंदार साबळे 
मानाचा विशाल गणपती गुरूवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास दिल्लीदरवाजाबाहेर पडला. 
गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीच्या स्वागतासाठी नवीपेठेतील विशाल इलेक्ट्रॉनिक्सतर्फे काढण्यात आलेली रांगोळी. 

\"ड्राय डे\' धाब्यावर, भक्तांसाठी खास व्यवस्था 
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी \"ड्राय डे\' घोषित करण्यात आला होता, तरीही राजकीय नेतेमंडळींनी आपल्या गणेशभक्तांसाठी \"खास व्यवस्था\' केली होती. त्यामुळे अनेकांनी नशेतच गणरायाला निरोपाला दिला. किरकोळ बाचाबाचीचे प्रकारही घडले. त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केला. तथापि, पोलिसांनी यावेळी सावधगिरीचा पवित्रा घेतल्याचे दिसले. 

डीजेचा दणदणाट, हिडीस हावभाव 
शहरशिवसेना समझोता तरुण मंडळांनी यंदाही डीजे वाजवले. डीजेच्या आवाजावर अखेरपर्यंत कोणतेही निर्बंध घालण्यात आले नव्हते. चिंचोळ्या गल्लीबोळात धोकादायक इमारतींच्या परिसरातही ध्वनिमर्यादेच्या नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे मिरवणूक मार्ग दणाणून गेला होता. पावसाची रिपरिप सुरू होती. पावसात भिजत अश्लील गाण्यांवर तरुणांनी मद्यधुंद अवस्थेत हिडीस हावभाव करत ताल धरला होता. 

मुली महिलांची लक्षणीय उपस्थिती 
यंदाडीजेमुक्त मिरवणुकीचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे पारंपरिक वाद्यांच्या तालावर नेत्रदीपक मिरवणूक निघेल, अशा अपेक्षेने शहर, उपनगरातील युवती महिलांनी सायंकाळी मोठ्या संख्येने मिरवणुकीला हजेरी लावली. रस्त्याच्या दुतर्फा आबालवृद्ध मिरवणूक पाहण्यासाठी थांबले होते. ढोल, ताशे, पारंपरिक वेषभूषा केलेल्या मंडळांची मिरवणूक सर्वांनी पाहिली. मात्र, नवीपेठेत आलेल्या दोन मंडळांतील डीजेच्या तालावर मद्यधुंद तरुणांचे हिडीस नृत्य पाहण्यापेक्षा युवती महिलांनी निघून जाणे पसंत केले. 
 
बातम्या आणखी आहेत...