आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वपक्ष विसरून गाडे लढणार पंजावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नामांतर चळवळीतील लढाऊ नेते, माजी राज्यमंत्री आणि पँथर्स रिपब्लिकनचे पक्षाध्यक्ष असलेल्या गंगाधर गाडे यांनी औरंगाबाद पश्चिमधून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, तरीही त्यांना काँग्रेस उमेदवारी देईल का, याविषयी साशंकताच असल्याने ऐनवेळी ते अपक्षही निवडणूक लढवू शकतात, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
गाडेंनी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या. मनपाच्या निवडणुकांशिवाय त्यांना एकही निवडणूक जिंकता आलेली नाही. दलित पँथर, रिपब्लिकन पक्षात अनेक वर्षे काम केल्यावर सत्तेचा सोपान चढण्यासाठी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना कधीही राजकीय स्थैर्य लाभले नाही. त्यामुळे काही वर्षांच्या खंडानंतर ते आता निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. २००९ मध्ये आमदार संजय शिरसाट यांनी बाजी मारलेल्या पश्चिम विधानसभा (राखीव) मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसकडे दावेदारी केली आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस उमेदवारांचा प्रचारही केला. गाडे यांना आघाडी करण्यात स्वारस्य असले, तरी काँग्रेसने त्यांना ह्यपंजाह्ण चिन्हावर निवडणूक लढण्याचे सुचवल्याची माहिती आहे. काँग्रेसचे मागील पराभूत उमेदवार चंद्रभान पारखे यांचाही दावा आहे. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम करणारे आसाराम डोंगरे यांचे नातू डॉ. पवन डोंगरे यांनीही होर्डिंग्ज लावून आपण स्पर्धेत असल्याचे दाखवून दिले आहे. डॉ. जितेंद्र देहाडे, आत्माराम बोर्डे, जालिंदर शेंडगे यांच्यासह अनेकांनी मुंबईत नुकत्याच मुलाखती दिलेल्या आहेत. यांच्यापैकी एकाच्या पदरात किंवा काँग्रेसच्या धक्कातंत्रानुसार ऐनवेळी त्रयस्थालाच उमेदवारी मिळेल. शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांची उमेदवारी नक्की आहे; पण महायुतीतील रिपाइंने (ए) पश्चिमची जागा सोडण्याची मागणी केली. शिरसाट यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. त्यात गाडे यांना संधी िमळेल का? याविषयी साशंकता आहे. यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी मात्र काँग्रेसकडून आपल्याला अपेक्षा आहे, मात्र अपक्ष म्हणूनही आपण तयारी केल्याचे त्यांनी सांगितले.
धरसोड वृत्तीमुळे मागे
२००२ मध्ये गाडे यांनी स्वत:चा पक्ष रामदास आठवले यांच्या रिपाइंमध्ये विलीन केला. त्या वेळी त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदही मिळाले; पण सहा महिन्यांत विधिमंडळाच्या दोनपैकी एकाही सभागृहाचे सदस्य होता न आल्यामुळे त्यांचे मंत्रिपद आपोआपच रद्दबातल झाले. त्यानंतर गाडे यांनी बसपमध्ये प्रवेश केला होता व दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी झाल्याचे मुंबईतून घोषित केले होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात मेळावाही घेतला. राष्ट्रवादीकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.