आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक घर बाप्पाचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंद, उत्साह म्हटले की गणरायाच्या आगमनाची वर्दी मिळते. आरास, सजावट आणि आबालवृद्धांची लगबग दिसते, पण शहरातील एका तरुणाचे घर खास बाप्पांसाठीच आहे याचा पुरेपूर दाखला मिळतो. कारण या घरात प्राचीन ते अर्वाचीन काळापर्यंत आणि अगदी नारळाच्या गणपतीपासून ते लाकूड, दगड, धान्य आणि चंदनापर्यंत तसेच पानाफुलांपासून ते माती अन् पंचधातूंपर्यंत गणरायाची विविध ६०० रूपे पाहायला मिळतात. या घरातील एक एक गणपती पाहण्यासारखाच आहे. त्याविषयी...

स्वत: वेब डिझायनर असणाऱ्या या तरुणाला लहानपणापासूनच बाप्पाचा नाद. आपल्या चेतनानगरातील एस. डब्ल्यू. लॉजिक डेव्हलपमेंट या कार्यालयातील कामही या श्रद्धेमुळेच व्यवस्थित चालत असल्याचा त्याचा विश्वास. ‘रीडिंग दि फ्युचर’ असे कंपनीचे घोषवाक्य असणाऱ्या श्रीहर्ष वाघ्रूळकर यांनी आपला बाप्पाचा छंद जोपासला आणि त्यात सातत्याने वाढ केली.

पत्रिकेपासून झाला प्रारंभ
लहानपणी लग्न पत्रिकेवरील गणपती श्रीहर्ष कापून त्यांचा संग्रह करू लागले. त्यांच्याकडे हजारापेक्षा अधिक गणपती जमा झाले. त्यांच्या या छंदाची माहिती कळाल्यावर मग नातेवाईकही त्यांना गणेश मूर्ती भेट म्हणून देऊ लागले. या मूर्तींनी त्यांच्यावर अशी काही मोहिनी घातली की त्यांनी पत्रिकेवरील गणपती सोडून मग गणेशाच्या मूर्तींचा संग्रहच सुरू केला.

हा छंद जीवाला...
त्यांचा छंद पाहून सातवीत असताना त्यांना पहिल्यांदा एका नातेवाइकाने गणपतीची सुरेख मूर्ती भेट दिली होती. नंतर त्यांची नजर सातत्याने बाप्पाचे आगळे-वेगळे रूप शोधू लागली. जुन्या वस्तूंच्या बाजारात, भांड्याच्या दुकानात, लाकडाचे काम करणाऱ्याकडे, नातेवाईक, मित्रपरिवार अशा सर्वच ठिकाणी त्यांचा हा शोध सुरू असायचा. या मूर्ती जमवताना त्यांनी एकच अट ठेवली ती म्हणजे मूर्ती हटके असावी. सध्या त्यांच्या संग्रहात पंचधातू, पितळ, तांबे, चांदी, हस्तीदंत, चंदन, लाल माती, लाकूड, काच, प्लास्टिक आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहेत. प्रत्येक मूर्ती वेगळी आहे.

भारतभर शोध
मूर्तींच्या शोधात त्यांनी अख्खा दक्षिण भारत पालथा घातला. तिरुपती, चेन्नई, कर्नाटक, गोवा, जालना, पुणे, मुंबई आणि औरंगाबादेतून त्यांनी या मूर्तींचा संग्रह केला आहे. दक्षिणेत वैविध्यपूर्ण मूर्ती मिळतात, असे श्रीहर्ष यांचे मत आहे. पुण्यात गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी शनिवारवाड्याबाहेर गणपतीच्या जुन्या मूर्ती विकणारे लोक बसतात. श्रीहर्ष दरवर्षी येथे न चुकता जाऊन आपला संग्रह समृद्ध करतात.