आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडळाचे नाव नसलेल्या पावत्यांचा सर्रास वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरांत वर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे प्रकार होत आहेत. ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ असा उल्लेख असलेल्या पावत्या देऊन ही लूट सुरू आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी असलेल्या मंडळांनाच वर्गणी जमा करता येते. याव्यतिरिक्त वर्गणी जमा करणार्‍या मंडळांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. वर्गणीसाठी सक्ती करू नका, असे आवाहनही करण्यात आले. मात्र, यावर शक्कल लढवत काही गणेश मंडळांनी ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ असा उल्लेख असलेल्या पावत्या छापल्या आहेत. या पावत्यांवर मंडळाचे नाव किंवा नोंदणी क्रमांक छापलेला नाही. पाइपलाइन रस्ता परिसरात रस्त्याच्या बाजूला बसणारे भाजीविक्रते, तसेच दुकानदारांना अशा पावत्या देण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी पावत्या हाती टेकवून सायंकाळी वसुली करण्यात आली. दहा ते पंधरा जणांचे टोळके यात सहभागी झाले होते. अधिक विचारणा करणार्‍यांना धमकावण्याची भाषा या टोळक्याकडून सुरू होती. शहरातही विविध ठिकाणी वाहने अडवून वर्गणी जमा करण्याचे उद्योग सुरू होते. काही पावत्यांवर मंडळाचे नाव असले, तरी नोंदणी क्रमांक नमूद केलेला नव्हता.

वर्गणीसाठी दमदाटी
गणेशोत्सवाच्या नावाखाली आमची लूट होत आहे. तक्रार केल्यास मारहाण होण्याची भीती असल्याने पोलिसांकडे जाण्यास कोणीही धजावत नाही.’’ गोपाळ शेवाळे, भाजीविक्रेता