आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लवकरच येतंय ‘नगरी ढोल’ पथक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. गणरायाला वाजत-गाजत आणण्यासाठी नाशिकचे ढोल राज्यभर प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवाची मिरवणूक आणि ‘नाशिक ढोल’ हे जणू समीकरणच झाले आहे. पण आता मिरवणुकीत जोश आणण्यासाठी खास ‘नगरी ढोल’ येत आहेत. शहरातील ‘रिदम प्रतिष्ठान’ने हे ढोलपथक तयार करण्याचा विडा उचलला आहे.

नाशिकचे ढोलपथक महाराष्ट्रासह परराज्यांमध्येही प्रसिद्ध आहेत. कार्यक्रम कोणताही असो, नाशिक ढोलला मागणी असते. बाप्पाला आणण्यासाठी, तर हा ढोल हमखास मागवला जातो. मुंबई-पुण्यासह सर्वच शहरांमध्ये या ढोलपथकांच्या तारखा अगोदरच ‘बुक’ असतात. गेल्या वर्षीपासून खुद्द नाशिक शहरातही ढोलपथकांची कमतरता जाणवत होती. त्यामुळे राहुल शेलार यांनी ‘नगरी ढोल’ची संकल्पना मांडली. तन्मय घोडके व सुजित चव्हाण यांनी ती उचलून धरली व नगरी ढोलपथकाची तयारी सुरू झाली.

नाशिकपाठोपाठ आता नगरकरही ढोलपथकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणार आहेत. त्यासाठी खास ‘नगरी ढोल’ पथकाची स्थापना झाली आहे. शहराच्या संगीत परंपरेत भर घालणार्‍या या ‘नगरी ढोल’ पथकाच्या तालावर पावले थिरकणार आहेत. रिदम प्रतिष्ठानने पुढाकार घेत स्थापन केलेले हे ‘नगरी ढोल’ पथक गणेशोत्सव मिरवणुकीची शान वाढवेल.

सावेडीतील मैदानावर तयारी
प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन् यांचे सहकारी दर्शन दोशी यांच्याकडे तालवाद्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या राहुल शेलार यांनी ‘नगरी ढोल’ पथकाची संकल्पना मांडली आहे. पाश्चिमात्य व शास्त्रीय संगीत रचनाकार तन्मय घोडके यांच्यासह या उपक्रमाचे व्यवस्थापक सुजित चव्हाण हे या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन करीत आहेत. सध्या सावेडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानाजवळ संत निरंकारी भवनाच्या शेजारच्या मैदानावर या पथकाचे प्रशिक्षण सुरू आहे.

पथकात मुलींनाही प्राधान्य
रिदम प्रतिष्ठानतर्फे सुरू केलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमात सध्या 70 मुले-मुली सहभागी झाली आहेत. एक महिन्यापासून त्यांची तयारी सुरू आहे. आणखीही काही पथके तयार केली जाणार आहेत. ढोलपथकामध्ये मुलींनाही प्राधान्य दिले जाणार आहे. ढोल-ताशांच्या निनादात गणेशोत्सवात जल्लोष करण्यासाठी तालवाद्यांची आवड असणार्‍या संगीतप्रेमी युवक-युवतींनी प्रशिक्षणात सहभागी व्हावे.’’ राहुल शेलार, प्रशिक्षक, नगरी ढोल पथक.