आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणरायांच्या नशिबी पुन्हा डीजेंचा दणदणाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कोसळणारा पाऊस..‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष आणि ओसंडून वाहणार्‍या नागरिकांच्या गर्दीने यंदा मोठय़ा उत्साहात गणरायाला निरोप देण्यात आला. नगरच्या युवक व युवतींनी स्थापन केलेले ढोल-ताशा पथक यावेळच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाड्यातील मानाच्या विशाल गणपतीच्या दर्शनासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. विशेष म्हणजे सर्व गर्दी या गणेशाच्या विसर्जनापर्यंतच टिकली. सहकुटुंब आलेले नगरकर या गणेशाच्या विसर्जनानंतर सरळ घरी गेले. नंतर शक्तिप्रदर्शन करत आलेल्या व डीजेंच्या दणदणाटाला सूज्ञ नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. डीजेंवर कारवाई करण्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या घोषणा शेवटी वल्गनाच ठरल्या. पोलिसांनी त्याबाबत बघ्याची भूमिका घेतली. विशाल गणपतीचा रथ नऊ तासांच्या मिरवणुकीनंतर सायंकाळी साडेसहा वाजता दिल्लीगेट वेशीबाहेर पडला. त्यानंतर उरले ते फक्त डीजेंचे ध्वनिप्रदूषण व मद्यधुंद कार्यकर्त्यांचे हिडीस हावभाव.

इतर सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका डीजेच्या दणदणाटात मध्यरात्रीपर्यंत सुरू होत्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेत्यांचा प्रभाव असणार्‍या गणेश मंडळांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

मिरवणुकीत पुन्हा काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुदैवाने काही अनुचित प्रकार घडला नाही. विसर्जन मिरवणुकीत 13 गणेश मंडळे सहभागी झाली होती. मानाच्या विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या हस्ते सकाळी सपत्नीक पूजा करण्यात आली. त्यानंतर रथ ओढून विशाल गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. माळीवाडा येथून निघालेल्या या मिरवणुकीत हजारो गणेश भक्त सहभागी झाले. बंगाल चौकी, भिंगारवाला चौक, नगर अर्बन चौक, नवीपेठ आदी ठिकाणी नागरिकांनी विशाल गणपती रथाचे स्वागत केले. रथाच्या मार्गावर तेलीखुंटापासून नेता सुभाष चौकापर्यंत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रांगोळी रेखाटली होती. नवीपेठेत धामेजा परिवाराने दुर्वा व फुलांच्या साहाय्याने चौदा फूट व्यासाची रांगोळी काढली होती. नेता सुभाष चौकात महापौर शीला शिंदे व आमदार अनिल राठोड यांनी रथाचे स्वागत केले, तर दिल्लीगेट येथे विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी आरती केली.

मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत प्रथमच सहभागी झालेले नगरी ढोल-ताशा पथक सर्वांचेच आकर्षण ठरले. वेगवेगळ्या शाळांचे लेझिम व झांज पथकही मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी दांडपट्टा, तलवारबाजी, तसेच हवेत काठी फिरवून कला सादर केली. सकाळी साडेनऊ वाजता निघालेली विसर्जन मिरवणूक सायंकाळी साडेसहा वाजता दिल्लीगेटजवळ आल्यानंतर भाविकांनी गुलालाची उधळण करून गणरायाचा एकच जयघोष केला.

विशाल गणपतीपाठोपाठ माळीवाड्यातील संगम तरुण मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ, कपिलेश्वर मंडळ, नवरत्न मंडळ, समझोता तरुण मंडळ, शिवशंकर मित्रमंडळ, महालक्ष्मी मंडळ, नेता सुभाष मित्रमंडळ आदी मंडळांनी डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढली. कपिलेश्वर मित्रमंडळाने मात्र डीजेला फाटा देत पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढली. युवतींचे दांडिया पथक व महिला भजनी मंडळ हे या मिरवणुकीतील प्रमुख आकर्षण होते. सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मिरवणुकीतील उत्साह शिगेला पोहोचला. मानाच्या गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी नगरकरांनी छत्र्या हाती घेऊन रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

आठ मंडळांकडून डीजेचा दणदणाट
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या 13 पैकी 7 मंडळांनी ढोल-ताशाला फाटा देत डीजेला पसंती दिली. त्यात आमदार अरुण जगताप (शिवशंकर), आमदार अनिल राठोड (नेता सुभाष), अविनाश घुले (नवरत्न), संभाजी कदम (समझोता), मनेष साठे (महालक्ष्मी), दत्ता जाधव (माळीवाडा), बाळासाहेब बोराटे (नीलकमल), आदिनाथ तरुण मंडळ (माळीवाडा) यांच्या मंडळांचा समावेश आहे. ही मंडळे राजकीय व्यक्तींशी निगडित असल्याने त्यांच्या डीजेच्या आवाजावर शेवटपर्यंत कोणतेही निर्बंध नव्हते. त्यामुळे शहर दणाणून गेले होते.

नेता सुभाष चौकात घोषणाबाजी
प्रतिष्ठापनेच्या दिवशी झालेल्या वादामुळे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत नेता सुभाष चौकात मोठा बंदोबस्त ठेवला होता. आमदार अरुण जगताप यांच्या मंडळाची विसर्जन मिरवणूक रात्री साडेदहाच्या सुमारास नेता सुभाष चौकात आल्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ स्वरूपात घोषणाबाजी झाली. यावेळी पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी स्वत: जगताप यांच्या मंडळाचा डीजेचा आवाज कमी करण्यास भाग पाडले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना पुढे रेटून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. नंतर डीजेंचा आवाज पुन्हा वाढला.

पर्यावरणप्रेमींनी केले घरीच विसर्जन
पाइपलाइन रस्त्यावरील अहिल्यानगरीतील धनंजय कुलकर्णी, मच्छिंद्र खोकराळे, पुरुषोत्तम जोशी, गजानन देशमुख, किशोर जोशी व दादाराम हजारे या पर्यावरणप्रेमींनी घरीच ड्रममध्ये गणेशाचे विसर्जन केले. मागील वर्षी त्यांनी पवननगरमधील बारवेत श्रींचे विसर्जन केले होते. मात्र, त्यावेळी बारवेतील घाण पाहून यंदा घरीच विसर्जन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बहुसंख्य नागरिकांनी बाळाजीबुवा बारवेजवळ मनपाने तयार केलेल्या कृत्रिम हौदात बाप्पाचे विसर्जन केले. घरगुती गणपतींच्या विसर्जनामध्ये लहान-थोरांचा मोठा सहभाग होता. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी भावपूर्ण साद घालत जड अंत:करणाने गणरायाला निरोप देण्यात आला.

छायाचित्रकार गंभीर जखमी
विसर्जन मिरवणुकीचे छायाचित्रण करण्यासाठी भिंगारवाला चौकात लाकडी मचाण उभारण्यात आले होते. दुपारी 3 वाजता विशाल गणपतीची मिरवणूक चौकाकडे येत असताना छायाचित्र घेण्यासाठी काहीजण मचाणावर चढले. परंतु मचाण उभारणार्‍या संबंधितांच्या निष्काळजीपणामुळे हे मचाण कोसळले त्यात छायाचित्रकार दत्ता इंगळे हे गंभीर जखमी झाले. मचाण उभारणार्‍या संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.