आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा डेपोने तीनशे एकर जमीन नापीक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘टीम दिव्य मराठी’ने गुरुवारी बुरूडगावला भेट दिली. गावात प्रवेश करण्यापूर्वीच सीना नदीचे पात्र आहे, परंतु त्यातून शहराचे सांडपाणी वहात असल्याने गावकर्‍यांना या नदीपात्राचा काहीच फायदा नाही. उलट, अखंडपणे वाहणार्‍या सांडपाण्याचा उग्र वास गावकर्‍यांसाठी डोकेदुखीच ठरली आहे. गावात जाताच रस्त्यावर पडलेला कचरा, घोंगणार्‍या माशा, आणि मोकाट कुत्र्यांचा उपद्रव जाणवतो. गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मनपाच्या कचरा डेपोमुळे गावची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गावापेक्षाही वाईट अवस्था कचरा डेपोच्या आजूबाजूला असलेल्या शेतजमिनींची झाली आहे. ‘टीम दिव्य मराठी’ने गावासह संपूर्ण कचरा डेपो व परिसराची पाहणी केली असता तब्बल तीनशे एकर शेती नापीक बनल्याचे विदारक सत्य समोर आले. ही परिस्थिती केवळ कचरा डेपो, मनपा प्रशासन व पदाधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळेच निर्माण झाली असल्याचा आरोप बुरूडगाव ग्रामस्थांनी केला आहे.

साडेचार लाख लोकसंख्येच्या नगर शहरात दररोज जमा होणारा शंभर टन कचरा गेल्या नऊ वर्षांपासून कोणतीही प्रक्रिया न करता येथील कचरा डेपोत टाकण्यात येत आहे. मनपाने 2004 मध्ये बुरूडगावपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर वीस एकर जागा खरेदी करून त्या ठिकाणी कचरा डेपो उभारला. विशेष म्हणजे गावकर्‍यांना विश्वासात न घेताच ही कार्यवाही करण्यात आली. गावकर्‍यांनी कचरा डेपोला विरोध करत वाहने अडवली, मनपा कार्यालयावर आंदोलने केली, राजकीय पुढार्‍यांकडे हेलपाटे मारले, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट, पोलिस कारवाईची धमकी देत तेव्हाचे मनपा प्रशासन व सत्ताधार्‍यांनी गावकर्‍यांचा विरोध मोडून काढला. त्याची शिक्षा बुरूडगावकर गेल्या नऊ वर्षांपासून भोगत आहेत. वीस एकर जागेत रोज शंभर टन कचरा कोणतीही प्रक्रिया न करता टाकला जातो. त्यातील प्लास्टिकसारखा अविघटनशील कचरा वार्‍याबरोबर आजूबाजूच्या शेतजमिनीत पसरला आहे. नऊ वर्षांपासून हे चक्र असेच सुरू असल्यामुळे तीनशे एकर शेतजमीन नापीक बनली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी जमीन कसणे सोडून दिले आहे. शेती व्यवसायासाठी बहुतांश ग्रामस्थ शेतामध्ये वस्ती करून राहतात. मात्र, कचरा डेपोमुळे वस्तीवर राहणे व शेती करणे त्यांच्यासाठी एक अग्निदिव्यच ठरत आहे. कचरा डेपोची तकलादू संरक्षक भिंत ठिकठिकाणी पडली आहे. त्यामुळे डेपोतील कचरा वार्‍याबरोबर शेतजमिनींमध्ये अस्ताव्यस्त पसरला आहे. त्यामुळे डेपोच्या एक किलोमीटर परिघात प्लास्टिक कचर्‍याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी पुरता वैतागला आहे. व्यथा मांडूनही उपयोग होत नसल्याने हतबल झालेले शेतकरी स्वत:च्या नशिबाला दोष देत आलेल्या परिस्थितीला कसेबसे तोंड देत आहेत. कचरा डेपोमुळे शेती करणे, तर सोडाच, आता जगणेदेखील मुश्किल झाले आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी ‘टीम दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केल्या.

नातेवाईकही दुरावले
आम्ही वस्तीवर राहतो, परंतु कचरा डेपोमुळे परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर सोडणे धोक्याचे ठरत आहे. वार्‍याने घरापर्यंत येणारा कचरा, दुर्गंधी व घोंगणार्‍या माशांमुळे नातेवाईक घरी येण्याचे टाळतात, आले तरी साधा चहाही पित नाहीत. त्यामुळे गावात घर हलवण्याचा लकडा कुटुंबीयांनी लावला आहे.’’ जालिंदर हरिभाऊ काळे, शेतकरी.

दोन एकर शेती सोडून दिली
कचर्‍यामुळे शेती पूर्ण वाया गेली आहे. उन्हाळ्यात वार्‍यामुळे शेतात कचरा येऊन पडतो. प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा खच पडला आहे. त्यामुळे डेपोजवळची दोन एकर शेती गेल्या पाच वर्षांपासून सोडून दिली आहे. डेपोपासून काही अंतरावर असलेल्या शेतातही पीक आल्यावर कावळे व इतर पक्षांचा मोठय़ा प्रमाणात उपद्रव होतो. त्यामुळे महापालिकेने डेपो दुसरीकडे हलवला, तर आमच्यावर खूप मोठे उपकार होतील.’’ दत्तात्रय बाबू कुलटकर, शेतकरी.

जैविक व वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट
शहरात दररोज जमा होणार्‍या आठ क्विंटल जैविक व वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट कचरा डेपोत लावण्यात येते. त्यासाठी बायोक्लिन सिस्टिम या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. जैविक कचरा भट्टीत जाळला जातो, तर वैद्यकीय कचरा प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी विकण्यात येतो. संबंधित ठेकेदार कंपनी 13 वाहनांमधून शहरातील रुग्णालयांमधील कचरा संकलन करते.


उपायुक्त स्मिता झगडे यांना थेट सवाल
0 शेतीचे होणारे नुकसान कसे टाळणार ?
- कचरा डेपोची संरक्षक भिंत वाढवून कचरा शेतात जाणार नाही याची दक्षता घेऊ, त्यासाठी वरिष्ठांचा सल्ला घेण्यात येईल.
0 कचरा प्रक्रिया प्रकल्पाची कार्यवाही का रखडली ?
- त्यासाठी अनेकदा निविदा काढण्यात आल्या, परंतु ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नाही.
0 पूर्वीचा प्रकल्प का बंद पडला ?
- हायड्रोएअर टेक्नोटीक्स कंपनीला ठेका देण्यात आला होता, परंतु त्यांनी अचानक काम बंद केल्याने हा ठेका रद्द करण्यात आला.