आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा उचलण्याचे नियोजन कोलमडले, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेचे शहरातील कचरा उचलण्याचे केलेले नियोजन कोलमडले आहे. शहरात दररोज जमा होणाऱ्या सुमारे १४० टन कचऱ्यापैकी निम्माच कचरा उचलला जातो. उर्वरित कचऱ्याचे शहराच्या विविध भागात ढीग साचले आहेत. कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे भिजत घोंगडे अनेक वर्षांपासून कायम अाहे. प्रकल्पाच्या कामास गती मिळत नसल्याने कचरा उचलण्याचे नियोजनही कोलमडले आहे. परिणामी नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
शहरात तयार होणारा निम्मा कचरा उचलून तो बुरूडगाव येथील कचरा डेपोत टाकण्यात येतो. परंतु मागील अनेक वर्षांपासून कचरा डेपोतील कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही. आता येथील कचरा डेपोत ५० टन क्षमतेचा कचरा प्रकल्प उभारण्यात आला आहे, परंतु तो अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. अनेक वर्षांपासून हा कचरा एकाच जागेवर असल्याने प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम यंत्रणाच महापालिकेकडे नाही. त्यामुळे कचरा उचलण्याचे नियोजनही कोलमडले आहे.

रुग्णालयांमधील कचरा (बायो मेडिकल वेस्ट) वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा असतानादेखील हा कचरा इतर ओल्या-सुक्या कचऱ्याच्या घंटागाड्यांमध्येच टाकला जातो. मेडिकल कचऱ्यासह इतर कचऱ्याचेही जागोजागी ढीग लागले आहेत. पावसामुळे हा कचरा जागेवरच कुजला आहे. त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुरूडगावसह सावेडी उपनगरात स्वतंत्र शंभर टन क्षमतेचा कचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली, परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. कचरा प्रकल्प सुरू करून कचरा उचलण्याची यंत्रणा सक्षम करावी, तरच शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.
महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा हा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

कचरा संकलनासाठी ठेकेदार मिळेना
कचरा संकलन महापालिका खासगी ठेकेदारामार्फत करत होती. मात्र, ठेकेदाराशी बिनसल्याने मागील काही वर्षांपासून वर्षांपासून कचरा संकलनाचे काम महापालिका स्वत:च करत आहे. अनेक वेळा निविदा प्रसिध्द करूनही कचरा संकलनासाठी ठेकेदार मिळत नसल्याने महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फतच कचरा उचलावा लागत आहे. मात्र, अपुरे कर्मचारी तोकडी यंत्रणा यामुळे कचरा संकलनाचे नियोजन कोलमडते.

नागरिकांना हव्यात ठोस उपाययोजना
शहरातील अनेक भागात घंटागाड्या जात नाहीत, तसेच कचराकुंड्याही नाहीत. त्यामुळे कचरा टाकायचा तरी कुठे, असा प्रश्न आहे. त्यासाठी महापालिकेने प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी पोहोचेल, तसेच प्रत्येक वसाहतीमध्ये एकतरी कचराकुंडी असेल, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. अशा ठोस उपाययोजना झाल्या, तर नागरिकांवर उघड्यावर कचरा टाकण्याची वेळ कुणावरही येणार नाही.
बातम्या आणखी आहेत...