आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरित लवादाचा मनपाला पुन्हा दणका, कचरा डेपोमुळे बाधितांना अडीच हजार रुपये देण्याचा आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका प्रशासनाला राष्ट्रीय हरित लवादाने पुन्हा दणका दिला. कचरा डेपोमुळे बाधित प्रत्येक शेतकरी कुटुंबाला पंधरा दिवसांत अडीच हजार रुपये देण्याचा आदेश लवादाने दिला. पंधरा दिवसांत पैसे दिले नाहीत, तर नंतर प्रत्येक शेतकरी कुटुंबास पाच हजार रुपये द्यावे लागतील. लवादाच्या या निर्णयाने मनपाचे धाबे दणाणले.

लवादाच्या आदेशाकडे महापालिका प्रशासन पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केले. त्यामुळे लवादाने आयुक्त विलास ढगे यांना जबाबदार धरत २० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतरही मनपाला जाग आल्याने लवादाने नुकत्याच झालेल्या सुनावणीत प्रशासनाला दुसरी चपराक दिली. कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केल्याने बाधित शेतकरी कुटुंबांना अडीच हजार रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. येत्या पंधरा दिवसांत हे पैसे दिले नाहीत, तर पाच हजार रुपये भरपाई देण्याचे आदेशही लवादाने दिले आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे.

मनपाने बुरूडगाव येथे तब्बल २० एकर जागेवर कचरा डेपो उभारला आहे. शहरात दररोज जमा होणारा सुमारे १४० टन कचऱ्यापैकी ८० ते ९० टन कचरा तेथे टाकला जातो. मात्र, हा कचरा टाकताना त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. परिणामी डेपोजवळील शेकडो एकर शेती नापीक झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी कचरा डेपोस वेळोवेळी विरोध केला. परंतु शेतकऱ्यांचा विरोध धुडकावत मनपाकडून कचरा टाकण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे बुरूडगावचे ग्रामस्थ राधाकिसन कुलट, जनार्दन कुलट, महेश जाधव, सुरेखा कुलट यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे मनपाविराेधात दाद मागितली. लवादाने वेळोवेळी मनपा प्रशासनाची कानउघाडणी केली. मात्र, मनपा अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनीदेखील लवादाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे लवादाने कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाकडे सोपवली. त्यासाठी मनपाने साडेचार कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले. निविदा काढून कचरा प्रकल्पाची कार्यवाही सुरू करण्यात आली, परंतु हा प्रकल्प केवळ ५० टन क्षमतेचाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नसल्याने त्यांना भरपाई म्हणून अडीच हजार पंधरा दिवसांत देण्याचे आदेश लवादाने दिले.

आदेशाची प्रतीक्षा
लवादापुढेसुनावणी होऊन त्यात अडीच हजार रुपये बाधित शेतकऱ्यांना देण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. मात्र, या आदेशाची प्रत अद्याप मनपा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. प्रत प्राप्त झाल्यानंतरच पैसे देण्याबाबतचा विचार होईल. नेमके िकती शेतकऱ्यांना पैसे द्यायचे, याबाबतही मनपा प्रशासनाचा गोंधळ उडणार आहे.

लढा सुरूच राहणार
आमचेसर्व जीवन शेतीवर अवलंबून आहे. मनपाच्या कचरा डेपोमुळे आमची शेती नापिक झाली आहे. लवादाने वेळोवेळी आदेश देऊनही मनपा चालढकल करत अाहे. आमचा लढा यापुढेही सुरूच राहणार आहे. आम्हाला अडीच हजार नकोत. आमचा प्रश्न कायमचा सुटणे महत्त्वाचे आहे.'' जनार्धनकुलट, याचिकाकर्ते.