संगमनेर - शहरातील भाजीपाला बाजारातील कापड दुकानाला रविवारी सकाळी आग लागली. अरुंद रस्ते, बाजार आणि गर्दीमुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी आल्या. मात्र, अग्निशामक बंब, मालपाणी उद्योग समूह व नगरपालिकेच्या टँकरद्वारे तीन तासांनंतर आग आटोक्यात आली. आगमी सुमारे 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नेहरू चौकात सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेले घनश्याम डंग यांच्या मालकीचे ओमसाई कापड दुकान आहे. शनिवारी संध्याकाळी दुकान बंद करून ते घरी गेले. रविवारी सकाळी दुकानातील कपड्यांनी पेट घेतला. सकाळी साडेआठच्या सुमारास बंद शटरमधून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने आगीचा प्रकार लक्षात आला. काही वेळातच नगरपालिका व थोरात साखर कारखान्याचे बंब घटनास्थळी पोहोचले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलिस कर्मचारी बाबासाहेब काळे व पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी गर्दी नियंत्रणासाठी मदत केली.
अनर्थ टळला
दुकानाच्या वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहते. आग लागल्याचे त्यांना कळले नाही. तीन मुली घरातच झोपलेल्या होत्या. नागरिकांनी ताबडतोब वर जात झोपलेल्या मुलींना व गॅस सिलिंडर बाहेर काढले. खालच्या मजल्यावर आग लागल्याची कल्पना या कुटुंबाला नव्हती. थोडा जरी उशीर झाला असता, तर या कुटुंबाला बाहेर काढणे कठीण झाले असते.