आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घरपोच गॅस’च्या नावाखाली ग्राहकांची लूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ग्राहकांकडून घरपोच सिलिंडरचे पैसे घ्यायचे. मात्र, ते द्यायचे रस्त्यावरच, असा नगरमधील काही गॅस एजन्सींचा खाक्या बनला आहे. त्यामुळे ग्राहकांना जादा पैसे मोजूनही सिलिंडर उचलून घरी न्यावा लागत आहे. याकडे जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. ऐन दिवाळीच्या दिवसांत हे घडत आहे. गॅस एजन्सींच्या या मनमानीला चाप लावावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सावेडी परिसरात भारत गॅसच्या युनिटेक गॅस एजन्सीची गाडी येते. ग्राहकांनी तेथे नोंदणी केल्यावर एजन्सीच्या गाड्या त्या-त्या भागात जातात. मात्र, ग्राहकांना घरपोच सिलिंडर देण्याऐवजी ग्राहकांना सिलिंडर घेऊन चौकात रांग लावून ऊन, पावसात थांबावे लागते. सिलिंडर आणणारा गाडीचालक मनमानी पद्धतीने केव्हाही गाडी तेथे आणतो. त्यानंतर ग्राहकास सिलिंडर मिळाल्यावर त्याला ते स्वत: उचलून घरी न्यावे लागते. अनेकदा सिलिंडर घरी नेणार्‍यांत महिलाही असतात. तरीही गॅस एजन्सीच्या कर्मचार्‍यांना त्याची पर्वा नसते. या सर्व मनमानीला ग्राहक कंटाळले आहेत. या भागात अजून एक भारत गॅसची आनंद गॅस एजन्सी आहे. या एजन्सीच्या कर्मचार्‍यांकडूनही ग्राहकांना असाच त्रास सहन करावा लागतो. याकडे पुरवठा विभागाच्या व गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले आहे. संबंधित एजन्सीचालकांवर कारवाई करावी व सिलिंडर थेट दारात मिळावे, अशी ग्राहकांची मागणी आहे.

कारवाईबद्दल झटकले हात
शहर अन्नधान्य वितरण अधिकारी भारती सागरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, जादा दराने सिलिंडर देणार्‍या गॅस एजन्सीवर कारवाई करण्याचा अधिकार फक्त संबंधित गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांनाच आहे. आम्ही फक्त तपासणी करून कंपनीला अहवाल सादर करू शकतो. त्यानंतर असे किती अहवाल सादर केले, याबाबतची माहिती विचारण्यासाठी फोन केला असता, त्यांनी तो उचलला नाही.

अजय गॅस एजन्सीची सेवा मात्र घरपोच
आनंदऋषीजी मार्गावरील भारत गॅसची एजन्सी असलेल्या अजय गॅस एजन्सीतर्फे अनेक वर्षांपासून घरपोच सिलिंडरची सेवा दिली जाते. एजन्सीचे कर्मचारी ग्राहकांकडून फक्त 448 रुपयेच घेतात. या एजन्सीचे कर्मचारी थेट दारात सिलिंडर पोहोच करतात. हे करताना कोणतीही खळखळ ते करत नाहीत, जर अजय गॅस एजन्सीच्या कर्मचार्‍यांना जमते, तर आनंद गॅसच्या कर्मचार्‍यांना का जमत नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

ऑनलाइन बुकिंगने वाढल्या अडचणी
आता गॅस एजन्सीकडे नोंद केलेल्या मोबाइल क्रमांकावरून सिलिंडरची नोंदणी करावी लागते. मात्र, अनेकदा वारंवार नोंदणी करूनही सिलिंडर मिळत नाही. पूर्वीसारखीची फोनवर सिलिंडरची नोंदणी करण्याची ग्राहकांची मागणी आहे. गॅस असल्याचा शिक्का रेशनकार्डावर असल्याने रॉकेलही मिळत नाही. वेळी-अवेळी होणार्‍या भारनियमनामुळे इंडक्शन कूकरवरही स्वयंपाक करता येत नाही, अशी कैफियत काही गृहिणींनी व्यक्त केली.