आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन गॅस हवाय, मग बाराशेंचा तांदूळ घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अन्न सुरक्षा योजनेंतर्गत केंद्र सरकार अवघ्या दोन रुपयांत पाच किलो तांदूळ देणार आहे. मात्र, नगरमधील आनंद गॅस एजन्सी नवे गॅस कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांच्या माथी चक्क तांदूळ मारत आहे. हा तांदूळ मोफत नव्हे, तर तब्बल 1 हजार 200 रुपये घेऊन पाच किलो तांदूळ घेण्यासाठी सक्ती करत आहेत.

सणासुदीच्या काळात गॅसला मागणी वाढते, तसेच सर्वसामान्यही या सणानिमित्त नवीन गॅस कनेक्शन घेतात. याचाच फायदा आनंद गॅस एजन्सीने घेतला आहे. नवीन टाकीची किंमत 2 हजार 98 रुपये आहे. परंतु ज्या ग्राहकांनी सिलिंडरसाठी नवीन कनेक्शन गेतले, त्या ग्राहकांना नियमबाह्य पाच किलो तांदूळ खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. या तांदळासाठी 1 हजार 200 रुपये मोजावे लागत आहे. ग्राहकांची गरज ओळखून या एजन्सीने ग्राहकांची लूट सुरू केली आहे, अशी तक्रार गॅसग्राहकांनी पुरवठा अधिकार्‍यांकडे केली आहे. एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो होऊ शकला नाही.

असा उघड झाला प्रकार
छावा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सांगळे गॅसच्या दुसर्‍या सिलिंडर कनेक्शनसाठी आनंद एजन्सीत गेले. तेथे त्यांना नवीन टाकीबरोबर 1 हजार 200 रुपयांचा पाच किलो तांदूळ खरेदीची सक्ती करण्यात आली. गरज असल्याने सांगळे यांनी या सिलिंडरबरोबर तांदूळ घेतला. असाच अनुभव 3 वर्षांपूर्वी आल्याचे ग्राहक सुनील मुर्तडक यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.


... तर कारवाई
पत्रकारांशी काहीही बोलण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे या विषयावर मी काहीच बोलणार नाही. पण सक्ती करण्याचा प्रकार घडत असेल, तर या संदर्भात माहिती घेऊन कारवाई करणार आहे. ’’ सूर्यभान गुप्ता, सेल्स ऑफिसर, भारत गॅस.

चौकशीचे आदेश दिले
तांदूळ घेण्याची सक्ती करण्याचा प्रकार गंभीर आहे. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनुसार भारत गॅसच्या सेल्स ऑफिसरला या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी झाल्यानंतर संबंधित एजन्सीवर कारवाई करण्यात येईल. ’’ सोपानराव कासार, जिल्हा पुरवठा अधिकारी.

हे तर कलियुगातील दानव
सक्ती केलेला तांदूळ घेतला नाही, तर आम्हाला गॅस मिळणार नाही, अशी भीती ग्राहकांमध्ये आहे. नियमानुसार एक वस्तू घेताना दुसर्‍या वस्तुची सक्ती करता येत नाही. ग्राहकाकडे सक्ती केलेल्या वस्तुचे बिल असेल तर ग्राहक संरक्षक न्यायालयात धाव घेता येईल. अशाप्रकारे लूट करणारे कलियुगातील दानव आहेत.’’ शिरीष बापट, अध्यक्ष, ग्राहक संघ.

पुरवठामंत्र्यांकडून दखल
नगर शहरामध्ये गॅस एजन्सीकडून तांदळाची सक्ती करण्याचा प्रकार घडत असेल, तर ही गंभीर बाब आहे. या संदर्भात प्रशासकीय पातळीवर माहिती घेऊन नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

..तर ढोल बजाव आंदोलन
ग्राहकांकडून बेसुमार लूट करण्याचा प्रताप आनंद एजन्सीने सुरू केला आहे. या प्रकारामुळे सामान्य माणसाची लूट होत आहे. त्यामुळे नियमबाह्य तांदूळ खरेदी करण्याची सक्ती करणार्‍या आनंद गॅस एजन्सीवर तातडीने कारवाई व्हावी, याबाबत अखिल भारतीय छावा संघटनेने पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. एजन्सीवर कारवाई न केल्यास 12 नोव्हेंबरला ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात येईल.’’ शिवाजी सांगळे, अध्यक्ष, छावा संघटना.