आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरपोहोच सेवेचा बोजवारा; भारत पेट्रोलियमच्या एजन्सींसमोर ग्राहकांच्या रांगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भारत पेट्रोलियम कंपनीच्या शहरातील गॅसग्राहकांना गेल्या आठ दिवसांपासून एजन्सीच्या गोदामात चकरा माराव्या लागत आहेत. घरपोहोच सिलिंडर योजनेचा बोजवारा उडाला असून गोदामतही टाक्या उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांमध्ये असंतोष वाढतो आहे.
शहरात भारत पेट्रोलियमचे गॅस ग्राहक सर्वाधिक आहेत. युनिटेक, आनंद, अजय, कराचीवाला आदी प्रमुख एजन्सींमार्फत सिलिंडर पुरवले जातात. गेल्या आठ दिवसांपासून सिलिंडर उपलब्ध नसल्याचे एजन्सींकडून सांगण्यात येत आहे. युनिटेक व आनंद एजन्सीच्या ग्राहकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो आहे. घरपोहोचसाठी नोंदणी केलेल्या ग्राहकांना टाक्या मिळत नसल्याने सकाळीच हे ग्राहक एजन्सीच्या गोदामावर धडकतात. पाइपलाइन रस्त्यावरील आनंद गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे दृश्य गेल्या आठवडाभर दिसते आहे. याच रस्त्यावर असलेल्या युनिटेकच्या गोदामासमोर ग्राहकांची गर्दी वाढते आहे. सकाळच्या कामाचा महत्त्वपूर्ण वेळ ग्राहकांना गॅस मिळवण्यासाठी द्यावा लागतो. दीड-दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकहून गाडी आली की, ग्राहकांची झुंबड उडते. घरपोहोच सेवेला प्राधान्य देत सुरुवातीला टाक्या दिल्या जातात. तथापि, घरपोहोच टाक्या मिळत नसल्यानेच ग्राहक गोदामाकडे येत आहेत, याकडे दुर्लक्ष केले जाते.

यापूर्वी फोनवरून मागणी नोंदवली जात असे. मात्र, आता ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी सुरुवातीला ग्राहकांना मोबाइल क्रमांक नोंदवून घ्यावा लागतो. या प्रक्रियेची माहिती नसणाºया ग्राहकांनी अशी नोंदणी न केल्याने त्यांना टाक्या नाकारण्यात येत आहेत. प्रत्यक्ष कार्यालयात मागणी नोंदवण्यासाठी आलेल्या ग्राहकांनाही ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगण्यात येते, अशी मागणी नोंदवलेल्या ग्राहकांनाही टाक्या मिळालेल्या नाहीत.

ग्राहक गॅसवर अन् टाक्यांचा काळाबाजार करणार्‍यांवर खैरात होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे. बाराशे-तेराशे रुपयांना काळ्या बाजारात सहज टाकी उपलब्ध होते, असे काहींनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

नाशिकहून विलंब
"नाशिकहून गाडी न आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केल्याने ज्यांनी कार्यालय अथवा फोनवर मागणी नोंदवली आहे, त्यांची नोंदणी ग्राह्य धरली जात नाही. ऑनलाईन नोंदणी करणार्‍यांनाही पडताळणीसाठी कार्यालयात बोलवावे लागत आहे. लवकरच पुरवठा सुरळीत होईल. ’’
-सुरेश मुनोत, आनंद गॅस एजन्सी.

बैठकीत विचारणा करू
"एजन्सीच्या गोदामासमोर रांगा लागणे हे काय वेगळे चित्र नाही. ते साहजिकच आहे. आमच्याकडे यासंदर्भात कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. घरपोहोच योजनेबाबत काही सांगता येणार नाही. गॅस एजन्सीधारकांची 17 जूनला बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीत संबंधित एजन्सीकडे विचारणा करू. ’’
-सोपान कासार, जिल्हा पुरवठा अधिकारी.

आवाजही उठवता येत नाही
"आनंद गॅस एजन्सीबाहेर रिकाम्या टाक्या घेऊन दररोज येतो. रांगेत थांबून परतावे लागत आहे. टाक्या उपलब्ध का नाहीत, यासंदर्भात माहिती दिली जात नाही. विचारणा करावयास गेलेल्या ग्राहकांना दंडेलशाही करून गप्प बसवण्यात येते. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर टाकी मिळाल्याचा एसएमएस आला. परंतु प्रत्यक्षात टाकी मिळालीच नाही.’’
-संजय निर्मळ, ग्राहक.

बुकिंग करूनही टाकी मिळत नाही
"आठ-दहा दिवसांपूर्वी मी गॅस सिलिंडरची मागणी नोंदवली होती. घरपोहोच सेवा मला कधीही मिळालेली नाही. तीन दिवसांपासून मी दररोज चकरा मारतो आहे. मात्र, सिलिंडर उपलब्ध नसल्याने रिकाम्या हाताने परत यावे लागते. वेळ वाया जात असून नाहक मनस्तापही सहन करावा लागतो. ’’
-डॉ. राधाकृष्ण जोशी, ग्राहक.