आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईच्या झळा: गॅसचे भाव वाढल्याने खाद्यपदार्थ महागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करून हॉटेल, रेस्टॉरंट व केटर्संना महागाईची भेट दिली. व्यावसायिक गॅसच्या दरात तब्बल 384 रुपयांनी वाढ झाल्याने खाद्यपदार्थांचे भावही वाढणार आहेत. काही व्यावसायिकांनी दरवाढ जाहीर होण्यापूर्वीच 31 डिसेंबरपासून खाद्यपदार्थांचे भाव वाढवले आहेत.
मागील वर्षापासून सातत्याने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांत वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक पुरता जेरीस आला आहे. भारत पेट्रोलियम, इंडेन व हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. डिसेंबरपर्यंत दर 1,810 रुपये होता तो आता 2,194 रुपये झाला आहे. तब्बल 384 रुपयांनी ही वाढ झाली आहे.
सावेडी, केडगाव, भिंगारसह शहरातील अन्य भागांत मोठय़ा प्रमाणात हॉटेल व रेस्टॉरंट आहेत. हॉटेल व्यवसायात दरवर्षी 600 कोटी, तर रेस्टॉरंट व्यवसायात सुमारे 250 कोटींची उलाढाल होते. याशिवाय केटरिंगचा व्यवसाय शहरात मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यातून दरवर्षी 4-5 हजार जणांना रोजगार मिळतो. या व्यवसायाची उलाढाल 3 ते 4 कोटी आहे. मागील दोन वर्षांपासून केटरिंग व्यवसायाला दुष्काळामुळे ग्रहण लागले आहे. दुष्काळामुळे अनेकांनी लग्न समारंभ रद्द केल्याने उलाढाल निम्म्याने घटली. तीच स्थिती काही प्रमाणात हॉटेल व रेस्टॉरंटची होती. शहरात अधिकृत हॉटेलची संख्या 84 आहे, तर रेस्टॉरंट 150 आहेत. केटर्सची संख्या 75 आहे. प्रत्येक हॉटेलला महिन्याकाठी सहा-सात सिलिंडर लागतात. रेस्टॉरंटसाठी 5 सिलिंडर लागतात. केटरिंग व्यावसायिकांना लग्न समारंभ, मेजवान्यांसाठी महिन्याकाठी 10 सिलिंडर लागतात. गॅसच्या दरात 384 रुपयांनी वाढ झाल्याने हे व्यावसायिक अडचणीत आले.
पदार्थांच्या किमतीत 15 टक्के वाढ
गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत 15 टक्के वाढ झाली आहे. गॅसचा दर वाढल्याने आणखी 5 टक्के दरवाढ करावी लागणार आहे. गॅसबरोबरच विजेच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. ही झळ आमच्याबरोबरच ग्राहकांनाही सहन करावी लागणार आहे.’’ धनेश बोगावत, संचालक, स्वीट होम.
दहा टक्के वाढ करावीच लागणार
गॅसच्या दरात वाढ करून सरकारने हॉटेल व्यावसायिकांना आणखी महागाईच्या खाईत लोटले आहे. सर्वच वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनाही खाद्यपदार्थ व जेवणाच्या दरामध्ये 10 टक्के वाढ करावी लागणार आहे. त्याची झळ साहजिकच सर्वसामान्य ग्राहकांना बसेल.’’ हिरा जाधव, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन.
घरगुती गॅसही महागला
घरगुती गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. विनाअनुदानित दहावे सिलिंडर 1 जानेवारीपासून 220 रुपयांनी महाग झाले आहे. गॅस सिलिंडरच्या दरात वर्षभरात झालेली ही तिसरी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.
दरवाढ अन्यायकारक
एप्रिल, मेमधील विवाहांसाठी अगोदरच बुकिंग झाले आहे. अँडव्हान्स घेतला आहे. त्यामुळे जुन्या दरांप्रमाणे खाद्यपदार्थ द्यावे लागतील. आधी दुष्काळाचा फटका केटर्सला बसला होता. गॅस दरवाढ अन्यायकारक आहे.’’ सुरेश खरपुडे, अध्यक्ष, केटर्स असोसिएशन.