आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gatari Amavasya 2013, Gatari Festival In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साडेपाच टन मांसाहाराचा ‘गटारी’ला पडणार फडशा; चिकन, मटन व माशांचे भाव वाढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गटारी अमावास्या दोन दिवसांवर आल्याने अंडी, मासे, तसेच चिकन-मटनाला मागणी वाढली आहे. चिकन व मटनाच्या विविध प्रकारच्या डिशेसना प्रचंड मागणी आहे. यंदा ‘गटारी’ला शहरात सुमारे साडेपाच टन चिकन व मटनाची विक्री होईल, असा अंदाज व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला. तशा ऑर्डर व्यापार्‍यांनी घेतल्या आहेत. चिकन-मटनाच्या दरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्यामुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे.

श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी एक आठवडा आधीच चिकन व मटनाला मागणी वाढते. यंदा 6 ऑगस्टला गटारी अमावास्या, तर 9 ऑगस्टला रमजान ईद आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक व व्यापार्‍यांनी नेहमीपेक्षा दुप्पट कोंबड्या व बोकडांची जमवाजमव केली आहे. यंदा गावरान कोंबड्या कमी असल्याने बॉयलरला मागणी आहे. आषाढ आणि इफ्तार पाटर्य़ांमुळे कोंबड्यांच्या विक्रीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. चिकनच्या खपात 20, तर अंड्यांच्या विक्रीत 25 टक्के वाढ झाल्याचे विक्रेते अख्तर शेख यांनी सांगितले.

मागील दोन वर्षे दुष्काळ असल्यामुळे यंदा चिकन महाग झाले आहे. मार्केटमध्ये मालच नसल्याने व्यापार्‍यांना दर वाढवावे लागले आहेत. नगर शहरात रविवारी सुमारे दोन ते अडीच टन चिकन, मटनाची विक्री होते. गटारीला हॉटेल व ढाबेचालकांकडून दुप्पट मागणी असल्यामुळे ही विक्री साडेपाच टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. चिकन सध्या 300 रुपये किलो आहे. मार्केटमध्ये सध्या गावरान कोंबडी मिळणे अवघड झाले आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. शहरात दररोज सुमारे एक टन मटनाची विक्री होते. गटारी अमावास्येला शहरातील अनेक हॉटेलचालकांकडून मटनाला दुप्पट मागणी असते. सध्या 350 रुपये किलो दराने मटन मिळते. ‘गटारी’च्या पार्श्वभूमीवर हॉटेल व ढाबेचालकांनी ऑर्डर देऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे यंदा जवळपास अडीच टनांपर्यंत मटनाची विक्री होईल, असा अंदाज आहे. पावसाळा असल्यामुळे सध्या माशांची आवक कमी झाली आहे. त्यात समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीवर परिणाम होऊन मुंबईहून येणार्‍या खार्‍या पाण्यातील माशांची आवक घटली आहे. त्यामुळे त्यांचे दर किलोमागे 20-30 रुपयांनी वाढले आहेत.

‘गटारी’मागचा अन्वयार्थ
प्रत्येक अमावास्येला कोणते ना कोणते महत्त्व आहे. आषाढी अमावास्येला ‘दीप अमावास्या’ असेही म्हणतात. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. कणकेचे दिवे उकडून त्यामध्ये तेल टाकून ज्योत पेटवली जाते. गटार म्हणजे निषिद्ध गोष्टी टाकण्याची जागा. त्यामुळे या दिवशी सर्व वाईट सवयी वज्र्य करून श्रावण महिन्याचे स्वागत करायचे, असा संकेत आहे. श्रावणात सणांची रेलचेल असल्यामुळे मांसाहार वज्र्य असतो. त्यामुळे गटारी अमावास्येलाच मनसोक्त मांसाहार केला जातो.