नगर - खर्डा हे नाव गेल्या काही महिन्यांत वेगळ्याच घटनांमुळे चर्चेत होतं. पण गौरव बागडे या तरूणानं जामखेड तालुक्यातील खर्ड्याला चित्रपट निर्मितीच्या नकाशावर आणून या गावाचा नावलौ
किक वाढवला आहे.
गौरव हा पत्रकार श्रीराम बागडे यांचा मुलगा. अभिनयाची आवड असल्याने नाटकांत काम करणं, नाटक बसवणं हे छंद त्याने जोपासले. बारावीनंतर महिनाभर त्यानं मुंबईला गोरेगावच्या चित्रनगरीत जाऊन काम केलं. अर्थात तेव्हा त्याच्या वाट्याला भूमिकेऐवजी क्रेन ढकलण्याचं काम आलं. तेही त्यानं नीट शिकून घेतलं. मालिका आणि चित्रपटांचं चित्रीकरण कसं करतात, निर्मितीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात याचे पहिले धडे गौरवला तिथे गिरवता आले.
एकुलता एक मुलगा असल्याने गौरवला मुंबईहून गावी परतावं लागलं. बीए, बीएड करताना त्यानं मोबाइल शॉपी सुरू केली. पण रूपेरी आणि मखमली पडदा त्याला खुणावत होता. नगरच्या ग्रूपबरोबर तो नाटकांत काम करू लागला. त्याची भूमिका असलेल्या "हिय्या' नाटकाला पारितोषिक मिळाल्यामुळे उत्साह आणखी दुणावला. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याच निर्णय त्याने वयाच्या २४ वर्षी घेतला. घरच्यांनीही त्याला पाठिंबा दिला.
संत सद्गुरू सीतारामबाबा उंडेगावकर यांच्या जीवनावर "गुरू माऊली' हा चित्रपट तयार करण्याचं गौरवने ठरवले. त्यासाठी लागणारे तीन लाख रूपये त्याने जमवले. या चित्रपटाच्या डीव्हीडीचे लॉंचिंग नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते नुकतंच झालं. खर्डा, जामखेड, आष्टी, पाटोदा आदी ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे चित्रपट निर्मितीतच करिअर करण्याचा निर्णय गौरवने घेतला आहे. साईबाबांवरील अल्बम काढण्याची त्याची तयारी सुरू झाली आहे...
गौरव बागडे निर्मित "गुरू माऊली' या चित्रपटाचं चित्रीकरण खर्डा परिसरात झालं. त्यासाठी ट्रॉलीचाही वापर करण्यात आला. अभिनेते रवि पटवर्धन यांनी त्यात भूमिका केली आहे.
सुनील महाजन यांनी चढवला संगीत साज
"गुरू माऊली' या चित्रपटाला नगर येथील संगीतकार सुनील महाजन यांनी संगीत दिले आहे. त्यातील गाणी लोकप्रिय झाली आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण खर्डा परिसरातच अवघ्या २० दिवसांत पूर्ण करण्यात आलं. रवि पटवर्धन यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याने अतिशय कमी मानधनात गौरवच्या चित्रपटात काम केले आहे. मंुबई येथील अभिनेत्री जिनत खान, निर्मला, श्रीधर सिद्धेश्वर, चांदणी आदींच्या भूमिका त्यात आहेत. दिग्दर्शन अशोक कपूर यांचे आहे.