आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांच्या प्रश्नावर पुन्हा गाजली महासभा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या महासभेत खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. केवळ विरोधकच नाही, तर सत्ताधाऱ्यांनीही खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरल्याने सभा चांगलीच गाजली. खड्ड्यांचे पॅचिंग करण्यासाठी ७० लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती, परंतु हा निधी आता संपला असून उर्वरित खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार असल्याचे महापौर कदम यांनी सभागृहात स्पष्ट केले.
शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेले खड्ड्यांच्या पॅचिंगचे काम बंद झाले आहे. पॅचिंग केवळ मध्यवर्ती शहरातील काही ठरावीक रस्त्यांवरच झाले आहे. उपनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे पॅचिंग कधी होणार, असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत बारस्कर यांनी सभागृहात उपस्थित केला. सावेडी नाका रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न बारस्कर यांनी मागील सभेत उपस्थित केला होता. त्यावेळी सावेडी नाका रस्त्यावरील खड्डे तीन-चार दिवसांत बुजवण्यात येतील, असे आश्वासन प्रभारी शहर अभियंत्यांनी दिले होते. त्यानुसार या रस्त्यावरील काही खड्डे बुजवण्यात आले, परंतु उर्वरित खड्डे अजून तसेच आहेत. त्याबाबत बारस्कर यांनी प्रश्न उपस्थित केला.

सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता, सावेडी नाका, गुलमोहर रस्ता, कुष्ठधाम रस्ता आदी भागांतील खड्डे बुजवण्यात आले असल्याचा दावा अभियंत्यांनी केला. परंतु अभियंते सभागृहाला खोटी माहिती देत असल्याचे बारस्कर यांनी सांिगतले. सावेडी उपनगरातील खड्डे बुजवण्यात आले नसल्याचे त्यांनी सांिगतले. बारस्कर यांच्यासह सत्ताधारी नगरसेविका शारदा ढवण, मनीषा काळे, डॉ. सागर बोरुडे आदींनीही खड्ड्यांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.

केडगाव उपनगरातील खड्डे कधी बुजवणार, असा सवाल नगरसेवक सुनील कोतकर यांनी उपस्थित केला. उपनगरातील सर्वच नगरसेवक खड्ड्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले. खड्ड्यांच्या पॅचिंगसाठी ७० लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती. परंतु हा निधी आता संपला असून उर्वरित खड्ड्यांच्या पॅचिंगसाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. त्यातून उपनगरातील खड्ड्यांचे प्राधान्याने पॅचिंग करण्यात येणार असल्याचे महापौर कदम यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सभागृहातील खड्ड्यांचा गोंधळ संपला.
नेहरू मार्केटचा प्रश्न अनुत्तरितच
नेहरू मार्केटचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी ठेकेदारांनी कट रचला आहे, असा आरोप नगरसेवक दत्ता कावरे बाळासाहेब बोराटे यांनी केला. नेहरू मार्केटच्या जागेवर मंडई व्यापारी संकुल उभारण्याचा वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे यावर मी काहीच भाष्य करणार नाही, असे आयुक्त दिलीप गावडे यांनी स्पष्ट केले. सभागृहाने केलेल्या ठरावानुसारच निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. प्रकरण न्यायालयात असून न्यायालयाच्या निर्णयानंतरच पुढील कार्यवाही होणार असल्याचेही त्यांनी सांिगतले.

दैनिक दिव्य मराठीच्या वृत्ताची दखल
टीव्हीसेंटर येथील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलाच्या दुरवस्थेबाबत दैनिक दिव्य मराठीने बुधवारच्या अंकात वृत्त प्रसिध्द केेले होते. नगरसेवक कैलास गिरवले यांनी हे वृत्त सभागृहात दाखवून प्रशासनाला जाब विचारला. या संकुलातील गाळे अथवा संपूर्ण संकुलच भाडेतत्त्वावर द्यावे, तरच येथील प्रश्न सुटतील, असे गिरवले म्हणावे. नगरसेविका मनीषा काळे यांनीदेखील संकुलाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. संकुलातील गाळे शेतकरी बाजारासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
कोण काय म्हणाले?
कुमार वाकळे : बोल्हेगावउपनगरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी थेट अमरधामला यावे लागते; अथवा रस्त्याच्या कडेलाच अंत्यविधी करावा लागतो. त्यामुळे सावेडी स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावा. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्राधान्याने हा प्रश्न सोडवा.

सागर बोरुडे : महापालिकाकर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस विमा पॉलिसी करा. त्यासाठी यापूर्वीच ठराव करण्यात आलेला आहे. त्याचे पुढे काय झाले? वैद्यकीय उपचार घेताना कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी विमा पॉलिसीचा प्रस्ताव तातडीने तयार करा. वेगवेगळ्या विमा कंपन्यांचे प्रस्ताव मागवा.

कल्याण बल्लाळ : बुरूडगावरस्त्यावरील संकुलाचा ताबा अद्याप महापालिकेला मिळालेला नाही. जोपर्यंत संकुलाचा ताबा मिळत नाही, तोपर्यंत भाजीविक्रेत्यांना तेथे जागा देता येणार नाही. संकुल पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

बाळासाहेब बोराटे : बुरूडगावरस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट व्यापारी संकुलात भाजीविक्रेत्यांना बसायला जागा मिळालेली नाही. इतर व्यावसायिकांनी मात्र दुकाने सुरू केली आहेत. अधिकारी ठेेकेदार या सर्वांनी मिळून या संकुलात चोऱ्या केल्या आहेत.

बाबासाहेब वाकळे : शहरालापुरसे पाणी हवे आहे. विळद येथील एक्स्प्रेस फीडरचा प्रश्न तातडीने मार्गी लावा. कोटी २२ लाख रुपयांचा निधी महावितरणला देण्यासाठी तातडीने व्यवस्था करा. तसे झाले तरच विळद येथून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करता येईल.

परिमल निकम : मुळानगरयेथे पंप बसवल्याने पाणीउपसा वाढला आहे. परंतु विळद येथून शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी एक्स्प्रेस फीडरची आवश्यकता आहे. त्यासाठी कोटी २२ लाख रुपयांचा निधी भरावा लागेल.

गणेश कवडे : मुळानगरयेथे जास्त अश्वशक्तीचा विद्युत पंप बसवूनही शहराला पुरेसे पाणी मिळत नाही. भर उन्हाळ्यात नगर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होता, मग आता पाणीपुरवठा विस्कळीत का झाला? काहीही करा, पण शहराला पाणी द्या.
बातम्या आणखी आहेत...