आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घनश्यामच्या'ब्रँडिंग'चे पुढाऱ्यांकडून प्रयत्न सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बबनराव पाचपुते यांच्यासोबत चर्चा करताना घनश्याम दरोडे. छाया: अर्शद शेख - Divya Marathi
बबनराव पाचपुते यांच्यासोबत चर्चा करताना घनश्याम दरोडे. छाया: अर्शद शेख
श्रीगोंदे - सोशल इलेक्ट्रॉनिक मीडियावर आपल्या बेधडक विधानांमुळे सध्या गाजत असलेल्या तालुक्यातील घनश्याम दरोडे याच्या लोकप्रियतेचा वापर राजकीय नेत्यांकडून होत असल्याचे चित्र आहे. मनसेने या 'मल्लीनाथ'ला भेटीचे निमंत्रण 'कृष्णकुंज' वरून पाठवले आहे, तर खासदार राजू शेट्टी घनश्यामच्या भेटीसाठी रविवारी (१७ जानेवारी) त्याच्या गावी येत आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आपल्यावरील टीका विसरून या बारीकरावाची घरी जाऊन भेट घेत त्याला शुभेच्छा दिल्या. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरध्वनीवरून घनश्यामची ख्याली-खुशाली जाणून घेतली.
राजकीय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेधडकपणे मते मांडत व्यवस्था बदलण्याचा नारा देणाऱ्या छोट्या घनश्यामला माध्यमांनी जगासमोर आणले. वामनमूर्ती असलेल्या या मुलाचा हजरजबाबीपणा, नेत्यांना घेतलेले चिमटे, तिरकस प्रश्नांना दिली जाणारी बगल, बोचऱ्या प्रश्नांना प्रतिप्रश्न करून टाळणे या त्याच्या वैशिष्ट्यामुळे घनश्याम लोकप्रिय झाला आहे. अनेक चॅनेलवर त्याच्या मुलाखती झळकत आहेत. प्रामुख्याने शेती, सहकार, पीक-पाणी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बाजारभाव, ग्रामीण भागातील जनतेचे हाल, जनावरांचा प्रश्न या मुद्द्यावर त्याचे अभ्यासपूर्ण भाषण पाहून राजकीय नेते देखील अचंबित झाले आहेत. मनसेच्या प्रदेश कार्यालयातून घनश्यामला मुंबईचे बोलवणे आले आहे. तेथे त्याचा सत्कार करण्यात येणार आहे, तर ज्यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत प्रचार करून घनश्याम तालुक्यात चमकला त्या माजी मंत्री पाचपुतेंनी टाकळी लोणार येथे घरी जाऊन घनश्यामची भेट घेतली. खेळीमेळीच्या चर्चा चालू असताना त्याने गावातील रस्त्याचा पाचपुतेंकडे विषय काढला. तलावातून रस्ता करता येतो का? असे म्हणत पाचपुते यांनी तुम्हाला जाण्यायेण्यासाठी पर्यायी रस्ता आपणच करून दिल्याची आठवण करून दिली. पाचपुतेंच्या काष्टी येथील "परिक्रमा' या शैक्षणिक संकुलाच्या गॅदरिंगसाठी प्रमुख पाहुणा म्हणून दिलेले निमंत्रण घनश्यामने वेळ नाही म्हणून नाकारले. त्यावर तू "आता पक्का राजकारणी झालाय' अशी टिप्पणी पाचपुतेंनी केली. दरम्यान,घनश्यामच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेता येतो का या दृष्टीने शेतकरी संघटनेची चाचपणी सुरू असल्याची माहिती 'दिव्य मराठी'ला समजली आहे.
शेट्टी घेणार भेट
घनश्यामने उपस्थित केलेले मुद्दे शेतकरी संघटनेच्या विचारधारेची आठवण करून देतात. यामुळे खासदार शेट्टी रविवारी टाकळी लोणारला भेट देऊन घनश्यामशी चर्चा करणार असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
आज सत्कार
घनश्याम याला गुरुद्वारा येथे बोलावून पंजाबी-शीख समाजातर्फे त्याला रविवारी (१७ जानेवारी) सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक हरजितसिंग वधवा यांनी 'दिव्य मराठी'ला दिली. हा मुलगा समाजाचे दु:ख मांडतो, त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो हे कौतुकास्पद असल्याने त्याचा गौरव करण्यात येणार असल्याचे वधवा यांनी सांगितले.

हजारेंची घेतली भेट
घनश्यामची समाज परिवर्तनाची ऊर्मी पाहून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्याला भेटीचे निमंत्रण धाडले आहे. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश पोखर्णा यांच्यामार्फत घनश्यामने शनिवारी सायंकाळी हजारेंची यांची भेट घेतली.